अहेरी विशेष प्रतिनिधी दिनांक :- 13 फेब्रुवारी 2026
अहेरी नगर पंचायतीच्या राजकारणात एक मोठी खळबळजनक घटना घडली आहे. अधिकारांचा गैरवापर आणि नियमबाह्य ठराव मंजूर केल्याप्रकरणी नगराध्यक्ष आणि उपाध्यक्षांसह एकूण ९ नगरसेवकांना अपात्र ठरवण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय नगरविकास खात्याने कायम ठेवला आहे. या निर्णयामुळे अहेरीतील राजकीय गटाला मोठा धक्का बसला असून, राज्य निवडणूक आयोगाने रिक्त झालेल्या १० जागांसाठी तातडीने पोटनिवडणूक जाहीर केली आहे.
अहेरी नगर पंचायतीमध्ये अजय कंकडालवार यांच्या गटाची सत्ता होती. या कार्यकाळात नगरसेवकांनी आपल्या पदाचा आणि अधिकारांचा गैरवापर करून अनेक अवैध बांधकामांचे ठराव नियमबाह्य पद्धतीने मंजूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. विशेषतः अजय कंकडालवार यांच्या घरासाठी शासनाच्या जागेवर ‘उडान पूल’ बांधण्याबाबत घेतलेला वादग्रस्त निर्णय या कारवाईचे मुख्य कारण ठरला आहे.
या भ्रष्टाचाराविरोधात आणि नियमबाह्य कामकाजाविरोधात भाजप गटाने तीन वर्षांपूर्वी शासनाकडे पुराव्यासह तक्रार दाखल केली होती.
नगरविकास खात्याचा मोठा निर्णय आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वीच ९ नगरसेवकांना अपात्र ठरवले होते, मात्र या निर्णयाला स्थगिती मिळाली होती. अखेर नगरविकास खात्याने ही स्थगिती उठवली असून, या नगरसेवकांचे पद रद्द केले आहे.
अपात्र ठरलेल्या या नगरसेवकांना आता पुढील पाच वर्षे कोणतीही निवडणूक लढवता येणार नाही. यामुळे अनेक दिग्गजांचे राजकीय भवितव्य धोक्यात आले आहे.
१० प्रभागांत पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले असून अहेरी नगर पंचायतीमध्ये एकूण १७ पैकी १० जागा आता रिक्त झाल्या आहेत.
९ जागा हे अपात्र ठरवलेल्या नगरसेवकांमुळे रिक्त तर
१ जागा हे नगरसेविका स्व.सुनीता किशोर मंथनवार यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झाले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने या १० प्रभागांसाठी पोटनिवडणूक घेण्याचे आदेश दिले असून, यामुळे अहेरीमध्ये पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापणार आहे.
प्रशासनावरील विश्वास दृढ
नियमबाह्य कामे करणाऱ्या लोकप्रतिनिधींवर झालेली ही कडक कारवाई म्हणजे “कायद्यापुढे सर्व समान” असल्याचा पुरावा आहे. चुकीचे ठराव मंजूर करून शासकीय मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांना या निर्णयामुळे मोठा चपराक बसली असून, सामान्य जनतेचा प्रशासनावरील विश्वास पुन्हा एकदा वाढला आहे.
