जमीनदोस्त झालेला अवैद्य बहुमजली इमारत
अहेरी विशेष प्रतिनिधी दिनांक :- 13 फेब्रुवारी 2026
राजकीय वर्तुळात आणि संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलेली माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांची बहुमजली अनधिकृत इमारत अखेर नगर पंचायत प्रशासनाने जमीनदोस्त केली आहे. न्यायालयाकडून कोणताही दिलासा न मिळाल्याने प्रशासनाने ही धडक कारवाई पूर्ण केली असून, ‘कायद्यापुढे सर्व समान’ असल्याचा कडक संदेश या निमित्ताने देण्यात आला आहे.
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी अहेरी नगर पंचायत क्षेत्रात कोणत्याही प्रकारची तांत्रिक परवानगी किंवा नकाशे मंजूर न करता या अवाढव्य इमारतीचे बांधकाम सुरू केले होते. या बेकायदेशीर बांधकामाबाबत नगर पंचायत प्रशासनाने त्यांना वेळोवेळी नोटिसा बजावल्या होत्या.
नगर पंचायत प्रशासनाने बांधकामाच्या सुरुवातीपासूनच अजय कंकडालवार यांना तीन वेळा अधिकृत नोटिसा बजावल्या होत्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत बांधकाम सुरूच ठेवण्यात आले. प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अहेरी पोलीस स्टेशनमध्ये यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या कारवाईला स्थगिती मिळवण्यासाठी कंकडालवार यांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, इमारतीचे बांधकाम वैध असल्याचे कोणतेही ठोस पुरावे किंवा कागदपत्रे सादर करण्यात ते अपयशी ठरले. परिणामी, न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावत प्रशासकीय कारवाईचा मार्ग मोकळा केला.
प्रशासकीय ‘सर्जिकल स्ट्राईक’
न्यायालयाचा निकाल लागताच नगर पंचायत प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त आणि यंत्रसामग्रीसह घटनास्थळ गाठले. काही तासांतच ही टोलेजंग इमारत भुईसपाट करण्यात आली. ही कारवाई पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
“शासनाचे नियम सर्वांसाठी सारखेच आहेत. अनधिकृत बांधकाम कितीही मोठे असले तरी त्यावर कारवाई होणारच, हे या निर्णयाने स्पष्ट झाले आहे.”
नगर पंचायतीची ही कारवाई ऐतिहासिक मानली जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात राजकीय प्रभावाचा वापर करून केली जाणारी अनधिकृत बांधकामे आता प्रशासनाच्या रडारवर असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. या कारवाईमुळे परिसरात भूमाफिया आणि विनापरवाना बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
मा.सर्व न्यायालय व मा. अवर मुख्य सचिव नगर विकास यांच्या आदेशानुसार सदर अनधिकृत बांधकाम वर कारवाई केली आहे. – गणेश शहाणे, मुख्याधिकारी, नगर पंचायत अहेरी
