प्रतिनिधी विशेष प्रतिनिधी दिनांक:-11मार्च 2026
अहेरी परिसरातील सेंट फ्रान्सिस स्कूल, नागेपल्ली येथे शालेय बसमध्ये एका विद्यार्थ्यावर कंडक्टरने अमानुष मारहाण केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून संबंधित कंडक्टरवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंश मुकेश नामेवार हा विद्यार्थी रोजप्रमाणे शाळेतून बसने घरी जात असताना बसमधील कंडक्टरने त्याच्याशी वाद घालत त्याचा गळा दाबून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेची माहिती विद्यार्थ्याने घरी सांगितल्यानंतर पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
विद्यार्थ्याचे वडील मुकेश नामेवार यांनी सांगितले की, “माझ्या मुलाला बसमधील कंडक्टरने अमानुषपणे मारहाण केली. लहान मुलावर असा अत्याचार करणाऱ्याला सोडणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, बसमध्ये उपस्थित असलेल्या काही विद्यार्थ्यांनीही या घटनेची पुष्टी करत सांगितले की, “अंश फक्त बोलत होता म्हणून कंडक्टरने त्याला खूप मारले. बसमधील इतर मुलेही या प्रकारामुळे घाबरली होती.”
या घटनेनंतर पालक आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अनेकांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत अशा प्रकारे लहान मुलांवर हात उगारणे अत्यंत निंदनीय असल्याचे म्हटले आहे. काही पालकांनी तर शाळेच्या बसमध्ये ड्रायव्हर किंवा कंडक्टर म्हणून जबाबदार आणि प्रशिक्षित व्यक्तींची नियुक्ती करावी, अशी मागणी केली आहे.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, शाळेच्या बसमध्ये घडलेली ही घटना अत्यंत गंभीर असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शाळा प्रशासनाने या घटनेची तात्काळ चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
सध्या या प्रकरणाबाबत शाळा प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नसली तरी पालक आणि नागरिकांनी दोषींवर कडक कारवाई करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी जोरदार मागणी केली आहे.
#SchoolBus #StudentSafety #Gadchiroli #Sironda #SchoolIncident #VidarbhaNews24 #BreakingNews
