पातागुडम सिरोंचा विशेष प्रतिनिधी दिनांक 17 मार्च 2026
गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात शिक्षणाची गंगा पोहोचवण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाकडून राबविण्यात येत असलेल्या “एक गाव, एक वाचनालय” या उपक्रमाला सातत्याने प्रतिसाद मिळत असून, आज या उपक्रमांतर्गत 75 व्या सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन मौजा पातागुडम येथे उत्साहात पार पडले.
पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण व अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, तसेच स्पर्धा परीक्षांकडे त्यांचा कल वाढवणे हा आहे. या पार्श्वभूमीवर सिरोंचा उपविभागातील पोस्टे पातागुडम अंतर्गत मौजा कोर्ला माल येथे “क्रांतीसूर्य बिरसा मुंडा” सार्वजनिक वाचनालयाची उभारणी करण्यात आली.
या वाचनालयाचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संदेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी परिसरातील 200 हून अधिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने ‘ग्रंथदिंडी’ काढून करण्यात आली. या ग्रंथदिंडीत शालेय विद्यार्थी, ग्रामस्थ यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून व पारंपरिक वाद्यांच्या गजरात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या उपक्रमातून वाचनसंस्कृतीबद्दल जनजागृती करण्यात आली.
नवीन वाचनालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासिका, टेबल-खुर्च्या, विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तके, तसेच पुस्तकांसाठी कपाट अशा सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या वाचनालयाचा लाभ परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांना होणार असून, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीस मोठी चालना मिळणार आहे.
सन 2023 पासून सुरू असलेल्या या उपक्रमांतर्गत आतापर्यंत 74 वाचनालये स्थापन करण्यात आली असून, त्याचा लाभ 9 हजारांहून अधिक युवक-युवतींना झाला आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत 205 विद्यार्थ्यांनी विविध शासकीय विभागांमध्ये नोकरी मिळवली आहे.
गडचिरोली पोलीस दलाच्या या उपक्रमाचा सकारात्मक परिणाम म्हणून मागील पाच वर्षांत जिल्ह्यातील एकही युवक-युवती माओवादी संघटनांमध्ये भरती झाल्याची नोंद नाही. त्यामुळे हा उपक्रम सामाजिक परिवर्तनासाठी एक प्रभावी पाऊल ठरत आहे.
या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे पातागुडमचे प्रभारी अधिकारी पोउपनि. ज्ञानेश्वर धोत्रे, मपोउपनि. स्वाती बास्तेवाड, पोउपनि. मंगेश कोठावळे व इतर अधिकारी-अंमलदारांनी परिश्रम घेतले.
“विद्यार्थ्यांनी या वाचनालयाचा जास्तीत जास्त लाभ घेऊन शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडवावे,” असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी यावेळी केले.
पोस्टे पातागुडमचे प्रभारी अधिकारी पोउपनि. ज्ञानेश्वर धोत्रे यांच्या कार्यकाळात राबविण्यात आलेली विविध उपक्रम आणि विकासात्मक कामे ही खरोखरच स्मरणात ठेवण्यासारखी ठरली आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली केवळ कायदा व सुव्यवस्था राखण्यापुरते काम न करता सामाजिक बांधिलकी जपत शिक्षण, जनजागृती आणि गावांच्या सर्वांगीण विकासासाठीही प्रभावी पावले उचलण्यात आली आहेत.
विशेष म्हणजे, “एक गाव, एक वाचनालय” सारख्या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाची दारे उघडून दिली आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळातील ही कामगिरी केवळ स्मरणीयच नाही, तर प्रेरणादायी ठरत असून, समाजाच्या प्रगतीसाठी नवा आदर्श निर्माण करणारी आहे.
