बोरी (प्रतिनिधी) दिनांक 03 मे 2025
अहेरी तालुक्यातील राजापूर पॅच येथील रहिवासी संजय बाला येलेलवार व त्यांची पत्नी कमला संजय येलेलवार या भोई समाजातील दाम्पत्यावर अपघाताचे काळे सावट कोसळले. दिना नदीजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने कमला संजय येलेलवार (वय ३७) यांचा जागीच मृत्यू झाला, तर पती संजय किरकोळ जखमी झाले. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
संजय आणि कमला येलेलवार हे अत्यंत गरजू, मेहनती आणि सामान्य कुटुंबातील सदस्य असून, मासेमारी व मासे विक्री हा त्यांच्या कुटुंबाचा मुख्य व्यवसाय आहे. संजय शेती आणि मजुरी करून आपल्या संसाराचा गाडा ओढत होता, तर कमला आठवडी बाजारात मासे विक्री करून हातभार लावत होती. त्यांना कल्याणी, मोनिका, रेखा व श्रृती या चार मुली आहेत.
दरम्यान, २ मे रोजी सकाळी संजय आणि कमला दुचाकी (MH-33-AB-3203) वरून मासे घेऊन बोरी येथून अहेरीच्या आठवडी बाजारात विक्रीसाठी निघाले होते. दिना नदीजवळ पोहोचताच एका अज्ञात भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेमुळे कमला यांचा जागीच मृत्यू झाला. संजय किरकोळ जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले.
चार मुलींवर दुःखाचा डोंगर
आईचा अचानक झालेला मृत्यू ही बातमी कळताच त्यांच्या चारही मुलींवर दुःखाचा डोंगर कोसळला. आपल्या मायेसारख्या आधारवडाला गमावल्याचे दु:ख त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. संपूर्ण गाव आणि भोई समाज या दुःखद घटनेने हादरून गेला आहे.
घटनास्थळी नागरिकांचा रोष – पोलिसांनी दिलासा दिला
घटनेची माहिती मिळताच बोरी व राजापूर पॅच येथील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. अपघाताची तीव्रता पाहून संताप व्यक्त करत त्यांनी अज्ञात वाहनचालकाच्या शोधाची मागणी केली. यावेळी अहेरी पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्री. स्वप्नील इजपवार आणि त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी उपस्थित नागरिकांना शांततेचे आवाहन करत आश्वासन दिले की, “या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित वाहनचालकावर कठोर कारवाई करण्यात येईल.”
पोलिसांकडून पुढील तपास सुरू
सदर प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक स्वप्नील इजपवार यांच्या मार्गदर्शनाखाली अहेरी पोलीस करत असून, अज्ञात वाहनचालकाचा शोध सुरू आहे. अपघातानंतर वाहनचालकाने पळ काढल्याची माहिती मिळाली आहे.
या अपघातामुळे गरीब कुटुंबातील कष्टकरी महिलेचा जीव गमवावा लागला असून, तिच्या पश्चात पती आणि चार चिमुकल्या मुलींचा जगण्यासाठीचा संघर्ष अधिकच कठीण झाला आहे. प्रशासनाकडून या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणीही नागरिकांमधून होत आहे.