सिरोंचा विदर्भ न्यूज 24 नेटवर्क दिनांक:-10/05/2025
सिरोंचा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अलीकडील काळात वाढलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याचा गांभीर्याने घेत गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल (भा.पो.से.) यांच्या सूचनेनुसार विशेष तपास मोहीम हाती घेण्यात आली. याच तपासाअंतर्गत ९ मे रोजी सिरोंचा पोलीसांनी एक संशयित इसमाला अटक करत मोठा गुन्हेगारी प्रकार उघडकीस आणला आहे.
अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आकाश नागया कोत्तापेल्ली (वय २०, रा. कोत्तापेल्ली, ता. सिरोंचा) असे असून, तो एक सराईत गुन्हेगार असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी त्याला गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यात असलेल्या वस्तूंबाबत समाधानकारक उत्तर न दिल्याने सखोल चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
चौकशीत त्याने सिरोंचा व असरअली परिसरातील एकूण ११ चोरीच्या घटना केल्याची कबुली दिली. त्याच्या कबुलीनुसार विविध ठिकाणी छापे टाकून सुमारे ₹२,५१,७००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या मुद्देमालात इलेक्ट्रॉनिक उपकरणे, सिव्हिल कामाचे साहित्य, घरगुती वस्तू, कपडे व मोबाईल फोन्स यांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्यात आकाश कोत्तापेल्ली याचा एक साथीदारदेखील सहभागी असून तो सध्या फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत आणि लवकरच त्यालाही अटक करून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, प्रभारी पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, अप्पर पोलीस अधीक्षक (अहेरी) सत्यसाई कार्तिक, उपविभागीय पोलीस अधिकारी (सिरोंचा) संदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. यामध्ये पो.उपनिरीक्षक मारोती नंदे, ज्ञानेश्वर धोत्रे, नरेंद्र वांगाटे, प्रांजली कुलकर्णी, लावण्या जक्कन तसेच पो.शि. मनीष गर्गे, सुनिल घुगे, राकेश नागुला, मानतेश दागम, सुनील राठोड, संतोष भताने यांचा मोलाचा सहभाग होता.
गडचिरोली पोलीस नागरिकांना आवाहन करतात की, आपल्या घरांची व व्यावसायिक आस्थापनांची योग्य सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करावी. तसेच कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तातडीने पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.
सदर गुन्ह्याचा तपास सुरू असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.