सिरोंचा विदर्भ न्यूज 24 नेटवर्क दिनांक:-10/05/2025 महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील कालेश्वर येथे उद्या, १५ मेपासून सुरु होणाऱ्या सरस्वती पुष्कर महोत्सवासाठी भाविकांची लाखोंच्या संख्येने उपस्थिती अपेक्षित असून, या पार्श्वभूमीवर संपूर्ण परिसरात धार्मिक, सामाजिक आणि सुरक्षा उपाययोजना युद्धपातळीवर सुरू आहेत. हा महोत्सव २६ मे २०२५ पर्यंत चालणार असून, गोदावरी, प्राणहिता आणि गुप्त सरस्वती या तीन नद्यांच्या संगमावर श्रद्धाळू संगमस्नानासाठी मोठ्या संख्येने एकत्र येणार आहेत.
त्रिसंगम स्थळ असलेल्या कालेश्वरचे धार्मिक महत्त्व फार प्राचीन असून, दर १२ वर्षांनी सरस्वती नदीस मिळणारे पुष्कर पर्व यंदा या स्थळी साजरे होत आहे. २०२२ मध्ये प्राणहिता नदीस येथे पुष्कर लाभला होता. भारतीय खगोलशास्त्रानुसार बृहस्पती ग्रहाच्या राशीपरिवर्तनानुसार या पवित्र नद्यांना पुष्कर काळ प्राप्त होतो. संगमस्नान, दानधर्म, अभिषेक, गोदान, प्रवचन, भजन-कीर्तन, महाआरती, कालेश्वरेश्वराचे दर्शन यांसह विविध धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम या कालावधीत पार पडणार आहेत.

यंदाच्या सरस्वती पुष्कर महोत्सवासाठी विशेष गर्दी होणार असल्याने तेलंगणा सरकारने युद्धपातळीवर नियोजन सुरू केले आहे. वाहतूक नियंत्रण, तात्पुरती निवासव्यवस्था, अन्नछत्र, स्वच्छता सुविधा, प्राथमिक उपचार केंद्रे, पिण्याचे पाणी, शौचालयांची उभारणी, सीसीटीव्ही यंत्रणा, स्वयंसेवकांची नेमणूक अशा विविध बाबतींत अंमलबजावणी करण्यात येत आहे.
कायदा व सुव्यवस्थेसाठी कडक उपाययोजना
भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तेलंगणातील भूपालपल्ली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. निलेश खरे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महिला पोलिस, दंगा नियंत्रण पथके, सशस्त्र पोलीस, वाहतूक पोलीस, जलद प्रतिसाद दल (QRT) आणि विशेष शाखा अधिकाऱ्यांची तुकडी घटनास्थळी कार्यरत आहे. पोलीस नियंत्रण कक्ष आणि मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. कोणत्याही अनुचित प्रकारास आळा घालण्यासाठी व्हिज्युअल मॉनिटरिंगसह गस्तीही वाढवण्यात आल्या आहेत.
विविध राज्यांतील भाविकांची उपस्थिती
या महोत्सवात महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश, छत्तीसगड, मध्यप्रदेश आदी राज्यांतील भाविक मोठ्या संख्येने येत आहेत. सिरोंचा, अहेरी, आलापल्ली, भामरागड, चंद्रपूर, बीजापूर, कुमूरम भीम आदी परिसरातून नागरिक या ठिकाणी गर्दी करत आहेत. काही भाविक पायी यात्रेच्या स्वरूपात या स्थळी दाखल होत आहेत. धार्मिक संस्थांचे पदाधिकारी, संत, महंत आणि विविध मठांचे गुरु येथे प्रवचनांसाठी उपस्थित राहणार आहेत.
स्थानिक अर्थकारणाला चालना
पुष्कर पर्वाच्या निमित्ताने स्थानिक बाजारपेठांमध्ये विशेष उत्साह आहे. रिक्षा, ट्रॅक्टर चालक, किराणा दुकानदार, छोटे उद्योजक, फेरीवाले, हॉटेल व्यावसायिक, हातगाडीवाले आदींचा व्यवसाय तेजीत असून, स्वयंसेवी संस्था व महिला बचत गट देखील सेवाकार्यात कार्यरत झाले आहेत.
प्रशासनाचे आवाहन
भाविकांनी संगमस्नान करताना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून खबरदारी घ्यावी, गर्दीच्या ठिकाणी लहान मुलांकडे लक्ष द्यावे, आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी आणि प्रशासनाशी सहकार्य करावे, असे आवाहन तेलंगणा प्रशासन आणि पोलिस विभागाकडून करण्यात आले आहे. माहिती केंद्र, अन्नछत्र, आरोग्यसेवा आणि मदत केंद्रांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर संपूर्ण कालेश्वर परिसर आध्यात्मिकतेने न्हालेला असून, हे महापर्व धार्मिक श्रद्धा, संस्कृती आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक ठरणार आहे.