गडचिरोली | प्रतिनिधी दिनांक 11 मे 2025 गेल्या दोन वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तींच्या सततच्या हालचालींमुळे ग्रामीण भागात दहशतीचं वातावरण पसरले आहे. छत्तीसगड व ओडिशातून आलेल्या सुमारे २३ हत्तींचा कळप आता थेट मानवी वस्त्यांमध्ये घुसू लागला असून, यामुळे शेतमालाचे प्रचंड नुकसान आणि मानवहानीच्या घटना समोर येत आहेत.
आज दिनांक ११ मे रोजी सकाळी सहाच्या सुमारास आरमोरी तालुक्यातील मानापूर गावात दोन हत्ती गावात घुसले. ग्रामस्थांना हत्ती दिसताच काहींनी पाहण्यासाठी गर्दी केली, तर काहींनी त्यांना गावाबाहेर हाकलण्याचा प्रयत्न केला. या धामधुमीत इंदिरा सहारे (वय ६७) या वृद्ध महिलेला हत्तीने सोंडेने उचलून दूर फेकले, ज्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या.
प्राथमिक उपचारानंतरही दुर्लक्ष
गावकऱ्यांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली. वनकर्मचाऱ्यांनी महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्र, देलनवाडी येथे दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केवळ प्राथमिक उपचार करून त्यांना घरी घेऊन जाण्यास सांगितले. या प्रकाराची माहिती मिळताच आरमोरीचे आमदार रामदास मसराम यांनी रुग्णालयाला भेट दिली आणि त्यांनी गंभीर स्वरूप लक्षात घेऊन संबंधित महिलेला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असून, अधिक उपचार सुरू आहेत.
शेतपिकांचे मोठे नुकसान आणि नागरिकांमध्ये भीती
या हत्तींच्या कळपाने मागील काही महिन्यांत आंबेझरी, मरेगाव, कवडेझरी, कोरची आदी गावांमध्ये घरांवर हल्ले चढवून घरे उद्ध्वस्त केली आहेत. अनेक गावांतील नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी घरं सोडून जंगलात, शाळांमध्ये आश्रय घेतला आहे. शेतकऱ्यांचे मका, तूर, भात, भुईमूग यांसारख्या पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
मागील वर्षी चामोर्शी तालुक्यात श्रमिक श्रीकांत सतरे याचा हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला होता. अशा घटनांनी नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे.
वनविभागाची कारवाई अपुरी
वनविभागाने हत्तींच्या हालचालींवर ड्रोन व थर्मल कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवण्याचे प्रयत्न सुरू केले असले, तरी त्याचा फारसा उपयोग झालेला नाही. कळप पुन्हा पुन्हा मानवी वस्त्यांमध्ये परत येतो आहे. आजघडीला वनविभागाकडून केवळ सावध राहण्याचे आवाहन केले जात आहे, पण हत्तींपासून संरक्षणाची ठोस उपाययोजना अद्याप नाही.
गडचिरोली जिल्ह्यातील रानटी हत्तींचा त्रास आता टोकाला गेला आहे. या संकटाला केवळ वनविभागाने नव्हे तर प्रशासन, राजकीय प्रतिनिधी आणि स्थानिक यंत्रणांनी एकत्र येऊन सामोरे जाणे गरजेचे आहे. अन्यथा, मानवी जीवित आणि शेतीसाठी ही स्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.