गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक:-23/05/2025 महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील नव्याने कार्यान्वित करण्यात आलेल्या कावंडे फॉरवर्ड ऑपरेटिंग बेस (FOB) जवळ माओवादी गटांच्या हालचालींबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर गडचिरोली पोलिसांनी काल दुपारी मोठ्या प्रमाणावर नक्षलविरोधी ऑपरेशन राबवले.
हे ऑपरेशन अपर पोलीस अधीक्षक श्री. रमेश यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आले असून, यात सी-६० कमांडोच्या १२ पार्टीज (सुमारे ३०० कमांडो) आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाची (CRPF) एक तुकडी सहभागी झाली होती. हे पथक कावंडे व नेलगुंडा येथून इंद्रावती नदीकाठी हालचाल करत असताना, जोरदार पावसात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शोध मोहिम सुरु होती.
आज सकाळी नदीकिनारी घेराबंदी करताना आणि परिसराची झडती घेताना माओवाद्यांनी अचानक अंदाधुंद गोळीबार सुरू केला. त्याला सुरक्षा दलांनी सक्षम प्रत्युत्तर दिले आणि जवळपास दोन तासांपर्यंत दोन्ही बाजूंमध्ये गोळीबार सुरू होता.
सदर भागाची झडती घेताना खालील साहित्य हस्तगत करण्यात आले:
चार माओवादींचे मृतदेह
एक स्वयंचलित सेल्फ लोडिंग रायफल (SLR)
दोन .३०३ रायफल्स
एक भरमार (स्थानिक बनावटीची बंदूक)
वॉकी-टॉकीज, तात्पुरती छावणीसाठी साहित्य, नक्षल साहित्य व अन्य वस्तू
ठार करण्यात आलेल्या माओवादींची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, हे सर्व कडवे आणि सक्रिय माओवादी असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
सदर परिसरात अजूनही शोधमोहीम व नक्षलविरोधी कारवाई सुरू आहे.