एटापल्ली, विदर्भ न्यूज 24 नेटवर्क दिनांक:-29/5/2025 एटापल्ली तालुक्यातील वीजप्रश्नांवरून संतप्त नागरिकांच्या वतीने *भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकपा), अहेरी विधानसभा क्षेत्र* यांच्यातर्फे एक तीव्र आंदोलन हाती घेण्यात येत आहे. दिनांक 02 जून 2025 रोजी सकाळी 11:00 वाजता, जांबिया गट्टा येथील 11/33 के.व्ही. उपकेंद्रावर “ताला ठोको” आंदोलन करण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
तालुक्यातील नागरिक मागील अनेक महिन्यांपासून अत्यंत अस्थिर व विस्कळीत वीजपुरवठ्याच्या संकटाला सामोरे जात आहेत. महावितरण विभागाच्या अकार्यक्षम व्यवस्थापनामुळे वारंवार वीज खंडित होणे, वेळेवर दुरुस्ती न होणे, कर्मचारी अनुपलब्ध असणे आणि तक्रारींकडे होत असलेले प्रशासनिक दुर्लक्ष हे प्रश्न अत्यंत गंभीर बनले आहेत.
शेतकरी वर्ग, विद्यार्थी, व्यापारी आणि सामान्य नागरिक यांचे जीवनमान या असुविधांमुळे पूर्णपणे विस्कळीत झाले असून, नागरिकांनी वेळोवेळी निवेदने, लेखी तक्रारी आणि फोनद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला; मात्र याकडे कोणतेही समाधानकारक लक्ष दिले गेले नाही.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाने स्पष्टपणे सांगितले आहे की हा इशारा अंतिम असून, आंदोलनादरम्यान जर कोणताही अनुचित प्रकार घडला तर त्यास महावितरण प्रशासनच जबाबदार राहील. हे आंदोलन पूर्णतः लोकशाही मार्गाने राबवण्यात येणार असले तरी, जनतेतील असंतोष आणि रोष लक्षात घेता भविष्यात अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे राहू शकते, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:
1. जांबिया गट्टा 11/33 के.व्ही. उपकेंद्रावर संपूर्ण क्षेत्राकरिता किमान तीन वायरमन तात्काळ नियुक्त करावेत.
2. सदर उपकेंद्रावर कार्यरत असलेल्या वायरमनच्या कामचुकार वृत्तीची चौकशी करून शिस्तभंगात्मक कारवाई करावी.
3. अंदाजे सहा ऑपरेटर नियुक्त असताना प्रत्यक्षात एकच ऑपरेटर उपस्थित राहतो; त्यामुळे गैरहजर ऑपरेटरांवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.
भारतीय कम्युनिस्ट पक्ष, एटापल्ली तालुका यांच्या वतीने सर्व संबंधित यंत्रणांना हे सूचित करण्यात येते की, परिस्थिती नियंत्रणात ठेवायची असल्यास तातडीने मागण्या मान्य कराव्यात व वीज व्यवस्थापनात सुधारणा करावी. या मागणी पूर्ण ना झाल्यास भारतीय कम्युनिस्ट पक्ष, एटापल्ली तालुका च्या वतीने महावितरण कार्यालयाला ताला ठोकू असा इशारा कॉ. विशाल पूज्जलवार सहसचिव, भाकपा यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे
—