सिरोंचा तालुका प्रतिनिधी दिनांक:-04/06/2025 गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील लांबडपल्ली गावात घडलेल्या एका खळबळजनक घटनेने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. राजकुमार दुर्गया दुर्गम (वय २६, व्यवसाय – मंजुरी, रा. लांबडपल्ली) या युवकाचा अज्ञात इसमाने गळा दाबून निर्घृण खून केल्याची माहिती शिरोंचा पोलिसांनी दिली आहे. ही दुर्दैवी घटना ३ जून २०२५ रोजी रात्री १० ते ११ वाजेच्या दरम्यान घडल्याचा प्राथमिक अंदाज असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजकुमार हा आपल्या गावातीलच एका लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमात सहभागी होऊन रात्री साडेदहा वाजेदरम्यान घरी परत आला होता. घरात पोहोचल्यानंतर काही वेळेतच अज्ञात इसमाने त्याचा गळा दाबून खून केला. ही घटना घडताना कुणीही साक्षीदार नसल्यामुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड धक्का बसला आहे.
सिरोंचा पोलीस ठाण्यात या घटनेबाबत अपराध क्रमांक ९८/२०२५ अन्वये भारतीय दंड विधानाच्या कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला असून, शवविच्छेदनासाठी मृतदेह रवाना करण्यात आला आहे.
गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. ज्ञानेश्वर धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या कसोशीनं सुरू आहे. पोलीस निरीक्षक श्री. समाधान चव्हाण यांच्या देखरेखीखाली पथक तयार करण्यात आलं असून, अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी सर्व शक्य तोडगे अवलंबले जात आहेत. पोलिसांकडून गावातील सर्व संशयितांशी चौकशी केली जात असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन यांचा आढावा घेतला जात आहे.
या हत्येचं नेमकं कारण अजून समोर आलेलं नसून, ही घटना कौटुंबिक वादातून घडली की अन्य कोणत्या कारणामुळे, याचा तपास पोलीस विविध शक्यतांचा अभ्यास करून करत आहेत. राजकुमार दुर्गम हा शांत स्वभावाचा व कष्टाळू तरुण म्हणून गावात ओळखला जात होता. त्याच्या अशा अमानुष हत्येमुळे संपूर्ण गाव हळहळून गेला आहे.
सिरोंचा पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की, या घटनेबाबत कुणाकडे काही माहिती असल्यास त्यांनी पुढे येऊन माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असंही पोलीस प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.
माहितीसाठी खालील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा: 🔹 पोलीस निरीक्षक श्री. समाधान चव्हाण – 📞 83699 75730
🔹 पोलीस उपनिरीक्षक श्री. ज्ञानेश्वर धोत्रे – 📞 77219 80878
या घटनेने गावकऱ्यांमध्ये भीती आणि अस्वस्थता पसरली आहे. पोलिसांनी आरोपीला लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. सिरोंचा पोलीस तपासात गुन्हेगार लवकरच गजाआड होईल, अशी आशा व्यक्त होत आहे.