सिरोंचा तालुका प्रतिनिधी दिनांक:-08/06/2025 गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम व सीमावर्ती भागातील सिरोंचा तालुक्यातील लांबडपल्ली गावात घडलेल्या एका गंभीर खुनाच्या घटनेचा पोलिसांनी केवळ तीन दिवसांत छडा लावून संशयित आरोपीस अटक केली आहे. या तपासात अनैतिक संबंधांचा संशय ही खुनामागील प्रमुख कारण असल्याचे निष्पन्न झाले असून, पोलिसांच्या वेगवान कारवाईबद्दल नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
घटना ३ जून २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास घडली.घटना: अंधाराचा फायदा घेऊन गळा दाबून खून राजकुमार दुर्गया दुर्गम (वय २५) हा युवक नेहमीप्रमाणे आपल्या कामावरून परत येत असताना, अज्ञात इसमाने त्याचा गळा आवळून खून केला. यावेळी गावात वीजपुरवठा बंद असल्याने संपूर्ण परिसर अंधारात होता. विशेष म्हणजे, त्याच दिवशी गावात मलय्या कुम्मरी आणि सडवली आकुदरी यांचे हळदी समारंभ सुरू होते. त्यामुळे गावातील बहुतेक नागरिक समारंभस्थळी गेले होते आणि गाव जवळपास ओस पडलेले होते. याच संधीचा फायदा घेऊन हा घातपात करण्यात आला..
सदर प्रकरणी सिरोंचा पोलीस ठाण्यात IPC कलम 103(1) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाच्या गांभीर्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला गती देण्यात आली. तपासाची जबाबदारी पोलीस उपनिरीक्षक श्री. ज्ञानेश्वर धोत्रे यांच्याकडे सोपवण्यात आली.
-आव्हानात्मक तपासकार्य आणि आरोपीचा शोध
खुनाच्या वेळी लाईट नसणे, गावात साक्षीदार नसणे, आणि कोणताही स्पष्ट पुरावा उपलब्ध नसल्याने तपास अत्यंत आव्हानात्मक ठरला. परंतु, पोलिसांनी हार न मानता, शेकडो लोकांची चौकशी केली, फोन रेकॉर्ड्स, हालचाली, वर्तणूक यांचा अभ्यास केला. तपासादरम्यान, पोलिसांना बापू ट्यंकटी जिमडे (रा. लांबडपल्ली) याच्यावर संशय आला. आणि त्याला अटक करून न्यायालयात सादर करण्यात आला
खुनामागील कारण: संशयिताच्या पत्नीबाबत संशय
सखोल चौकशीनंतर समोर आले की, मृत राजकुमार दुर्गया दुर्गम आणि आरोपी बापू ट्यंकटी जिमडे यांच्या कुटुंबांमध्ये तणावाचे वातावरण होते. आरोपीला आपल्या पत्नीच्या आणि मृत राजकुमारच्या संबंधांबाबत संशय होता. या संशयातूनच रागाच्या भरात त्याने गळा आवळून राजकुमारचा खून केला।
या प्रकरणात आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता, पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आली. पोलिसांकडून आता पुढील तपास केला जात असून, आरोपीने खून केल्यानंतर वापरलेले साधन, पोशाख, व घटनास्थळी उपस्थित इतर संभाव्य व्यक्तींची माहिती गोळा केली जात आहे.
सिरोंचा पोलिसांची तत्परता, नागरिकांतून समाधान
या यशस्वी तपासामुळे सिरोंचा पोलीस दलाची घरफोडी, गांजा वाहतूक आणि गौतस्करी यांसारख्या गुन्ह्यांविरुद्ध केलेल्या मागील कारवायांप्रमाणेच पुन्हा एकदा विश्वसनीयता आणि तत्परता सिद्ध झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक श्री. ज्ञानेश्वर धोत्रे व त्यांच्या तपास पथकाचे स्थानिक नागरिकांकडून विशेष कौतुक करण्यात येत आहे.