गडचिरोली विदर्भ न्यूज 24 नेटवर्क दिनांक:-16/06/2025 गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम, नक्षलग्रस्त आणि सामाजिकदृष्ट्या वंचित भागातील विद्यार्थ्यांसाठी १५ जून २०२५ हा दिवस त्यांच्या आयुष्यातील मैलाचा दगड ठरला. केवळ शिक्षणासाठी नाही तर आत्मभानासाठी, नवस्वप्नांसाठी आणि एक वेगळा क्षितिज गाठण्यासाठी… गडचिरोली जिल्ह्यातील १२० विद्यार्थी बंगळुरूच्या ‘इस्रो’ या भारताच्या अवकाश संशोधन संस्थेला भेट देण्यासाठी प्रथमच विमानाने प्रवास करताना दिसले, ही घटना केवळ एक औपचारिक शैक्षणिक सहल नव्हे तर ग्रामीण भारताला आत्मविश्वास देणारा निर्णायक क्षण आहे.
या उपक्रमाची कल्पनाशक्ती आणि अमंलबजावणी यामागे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांची संकल्पना, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांची तत्काळ कृती, आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दूरदृष्टी या सर्वांचा एक सुंदर संगम दिसून येतो. विशेषतः मुख्यमंत्री स्वतः नागपूर विमानतळावर विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहतात, हे केवळ औपचारिकता नव्हे, तर राज्य शासनाच्या ‘शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन’ या भूमिकेची साक्ष आहे.
गडचिरोलीसारख्या जिल्ह्यातील बहुतेक मुले रेल्वे काय किंवा विमान काय, केवळ पुस्तकांतच पाहतात. काहींनी तर जिल्ह्याचे मुख्यालयही पाहिले नव्हते. पण आज त्यांनी आंतरराष्ट्रीय विमानतळ पाहिले, विमानप्रवास अनुभवला आणि भारताच्या अंतराळ क्षेत्रातील सर्वोच्च संस्थेला भेट दिली — ही बाब स्वतः विद्यार्थ्यांच्या दृष्टीने प्रेरणादायी तर आहेच, पण एकूण समाजमनाला शिक्षणाच्या नव्या दिशा दाखवणारी आहे.
इस्रो ही संस्था आज केवळ रॉकेट किंवा उपग्रह निर्माण करणारी संस्था नाही, तर ती भारतीय आत्मविश्वासाचे प्रतीक बनली आहे. आणि अशा संस्थेला गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पाहणे, वैज्ञानिकांशी संवाद साधणे आणि भारताच्या अंतराळ प्रगतीचा अनुभव घेणे, हे त्यांना ‘मी पण हे करू शकतो’ हे सांगणारे आहे.
या सगळ्याचे विशेष श्रेय डॉ. सचिन मडावी यांना द्यावे लागेल. समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून त्यांनी ज्या कल्पकतेने हे आयोजन केले, ते केवळ ‘योजना’ नव्हे तर संवेदनशील प्रशासनाचे जिवंत उदाहरण आहे. त्याचप्रमाणे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांचे पाठबळ या उपक्रमाला राजकीय इच्छाशक्तीची ताकद देणारे ठरले आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर, प्रश्न एवढाच — ही एकदाच झाली की याला सातत्य असेल?
जर प्रत्येक वर्षी निवडक होतकरू ग्रामीण विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने देशातील विज्ञान-तंत्रज्ञान संस्थांना भेटी घडवून आणल्या, तर ‘डोंगराळ भागातील मुलंही शास्त्रज्ञ होऊ शकतात’ हे स्वप्न केवळ शक्यच नव्हे, तर निश्चित होईल.
ही योजना म्हणजे सामाजिक समावेशन आणि शैक्षणिक भेद मिटवण्याच्या दिशेने केलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. आज ज्या मुलांनी ‘इस्रो’ पाहिले, ते उद्या स्वतः ‘अंतराळवीर’ व्हावे, एवढीच सदिच्छा!
—
– संपादक, संदीप राचर्लावार। विदर्भ न्यूज नेटवर्क
9421729671