गडचिरोली विदर्भ न्यूज 24 नेटवर्क दिनांक:-16/06/2025 गडचिरोली जिल्ह्यात अंमली पदार्थांची बेकायदेशीर तस्करी तसेच अन्य अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने कंबर कसली आहे. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी सर्व पोलीस ठाणे, उपठाणे व पोलीस मदत केंद्रांना कठोर कारवाईचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर १५ जून २०२५ रोजी गडचिरोली शहरात एका मोटारसायकलवर फिरून गांजा विक्री करणाऱ्या एका आरोपीस पोलिसांनी अटक केली.
गोपनीय माहितीच्या आधारे गडचिरोली पोलिसांनी सागर कवडू बावणे (वय २५, रा. कोटगल, ता. व जि. गडचिरोली) या इसमास गांजाची विक्री करत असताना रंगेहाथ अटक केली. पोलिसांनी पंचनामा करून त्याच्या ताब्यातून अंदाजे १३,८०० रुपयांचा गांजा, एक मोटारसायकल (किंमत अंदाजे ७५,००० रु.) आणि इतर मिळून एकूण ९०,७०५ रुपयांचा मुद्येमाल जप्त केला.
आरोपीविरुद्ध गुंगिकारक औषधे व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (NDPS Act), 1985 अंतर्गत गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. सत्य साई कार्तिक, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सूरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या कारवाईत गडचिरोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक दिपक चव्हाण, पो.उ.नि. चैतन्य काटकर आणि इतर अंमलदार यांनी सहभाग घेतला. पुढील तपास पो.उ.नि. दिपक चव्हाण करीत आहेत.
गडचिरोली पोलीसांनी स्पष्टपणे इशारा दिला आहे की, अंमली पदार्थांची विक्री, बाळगणे किंवा सेवन करणाऱ्यांविरोधात कठोर आणि नियमबद्ध कारवाई करण्यात येईल. असा इशारा देण्यात आली आहे