गडचिरोली वार्ताहर दिनांक 17 जून 2025 गडचिरोली जिल्ह्यात काही महिन्यांपासून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र होते. या घटनांमागे मोठा गुन्हेगारी नेटवर्क कार्यरत असल्याचा संशय पोलीस प्रशासनाच्या तपासात व्यक्त केला जात होता. जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी याची गंभीर दखल घेत सर्व पोलीस ठाण्यांना कठोर पावले उचलण्याचे आदेश दिले. या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाच्या सावरगाव पोलीस मदत केंद्र आणि स्थायी गुन्हे शाखेने संयुक्तपणे केलेल्या कारवाईत एक मोठे आंतरराज्यीय वाहन चोरांचे रॅकेट उघडकीस आले आहे.
या तपासाची सुरुवात ९ जून २०२५ रोजी सावरगाव पोलीस मदत केंद्रात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यापासून झाली. आरोपीकडून मिळालेल्या सुरागांवरून पोलिसांनी चौकशीची साखळी तयार केली. राजनांदगाव कारागृहात अटकेत असलेल्या विनयप्रकाश धरमु कुजुर (रा. गजामेंढी, ता. धानोरा) या संशयित आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्याच्या कबुलीनुसार या टोळीच्या गुन्हेगारी जाळ्याचा पर्दाफाश झाला.
विनयप्रकाशने पोलिसांसमोर कबुली दिली की, तो आणि त्याचे सहकारी विविध ठिकाणांहून दुचाकी वाहनांची चोरी करत. त्यानंतर बनावट कागदपत्रे तयार केली जात आणि ही वाहने स्थानिक बाजारात विक्रीस काढली जात. या टोळीमध्ये रवनू दसरू पदा, राकेश छबीलाल बादले, रामु झिकटुराम धुर्वे (सर्व रा. गजामेंढी), संजय मुन्ना लकडा व राजेंद्र चूंदा लकडा (रा. कवडू, जि. बलरामपूर, छत्तीसगड), तसेच राजेश पुरुषोत्तम सोनकुसरे (रा. तळेगाव, ता. कुरखेडा) यांचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले.
गडचिरोली पोलिसांनी या सर्व सात आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांना गडचिरोली न्यायालयात हजर केले असता, दि. २० जून २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील मुरुमगाव, कोरची, आरमोरी, पुराडा, कोटगुल, धानोरा तसेच छत्तीसगड राज्यातील विविध भागांत दाखल असलेल्या वाहन चोरीच्या एकूण १४ गुन्ह्यांची उकल झाली आहे. त्यातून एकूण ४२ दुचाकी वाहने जप्त करण्यात आली, ज्यांची एकत्रित किंमत १६ लाख ५ हजार रुपये इतकी आहे.
तपास अजूनही सुरू असून, या टोळीने अन्य ठिकाणीदेखील अशीच बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहने विक्री केली असल्याचा संशय आहे. त्यामुळे अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. या यशस्वी कारवाईसाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) सत्य साई कार्तिक, उपविभागीय अधिकारी (अतिरिक्त कार्यभार) रविंद्र भासले, स्थायी गुन्हे शाखेचे पोनि अरुण फेगडे, सपोनि भगतसिंग दुलत, सावरगाव पोमकेंचे पोउपनि विश्वंभर कराळे, पोउपनि राजेंद्र कोळेकर, मपोउपनि सिध्देश्वरी राऊत तसेच सर्व तपास पथकाने उल्लेखनीय भूमिका बजावली.
या कारवाईने गडचिरोली जिल्ह्यात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांवर काही प्रमाणात आळा बसण्यास मदत होईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे. पोलिसांनी केलेल्या सतर्क कारवाईमुळे आंतरराज्यीय टोळीचा फडशा पाडण्यात यश आल्याचे स्पष्ट झाले असून, हा तपास राज्यातील इतर जिल्ह्यांनाही महत्त्वपूर्ण ठरू शकतो