वैभव रामगीरकर सिरोंचा, दिनांक:-25/06/2025
सिरोंचा येथील कार्मेल अकॅडमी शाळेत नवीन शैक्षणिक वर्ष २०२५–२६ चे आगमन मोठ्या आनंदात व उत्साहात पार पडले. “माझा शाळेचा पहिला दिवस” या विशेष उपक्रमाने या सत्राची सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांसाठी हा अनुभव संस्मरणीय ठरला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने व भावपूर्ण प्रार्थना गीताने झाली. शाळेचे नवीन व्यवस्थापक फादर लिनेश (सी.एम.आय.) यांच्यासह नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन मनपूर्वक स्वागत करण्यात आले. नवागत विद्यार्थ्यांचे देखील व्यवस्थापक व मुख्याध्यापिका सिस्टर शीना यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व चॉकलेट देऊन मनमोहक पद्धतीने स्वागत करण्यात आले.
या स्वागत समारंभात विद्यार्थ्यांनी पारंपरिक व सांस्कृतिक नृत्य सादर करून उपस्थितांचे मन जिंकले व शाळेचा परिसर एक उत्सवाचे रूप धारण करत गेला. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी शाळेने “My First Day of My School” नावाचा सेल्फी पॉईंट तयार केला होता. हा सेल्फी पॉईंट विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. अनेकांनी येथे छायाचित्रे काढून या दिवसाचे क्षण कैद केले.
फादर लिनेश यांनी विद्यार्थ्यांना शाळेचे महत्त्व, नियमित उपस्थिती व शिस्तीचे महत्व पटवून देत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. शाळेच्या सर्व शिक्षकांनी परिश्रमपूर्वक नियोजन करत संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका सिस्टर शीना, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
#MyFirstDayAtSchool #CarmelAcademySironcha #नवीनशैक्षणिकवर्ष #विद्यार्थीसंपूर्णतेकडे #SchoolCelebration