सिरोंचा/आलापल्ली | प्रतिनिधी दिनांक:-26/06/2025. गडचिरोली जिल्ह्यातील अतिमहत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या आलापल्ली वनविभागात उपवनसंरक्षकपदी दिपाली राजन तलमले (वनकर) यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे. त्यांच्या प्रदीर्घ प्रशासकीय व वनसेवेतील अनुभवाच्या बळावर, स्थानिक जनता, पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते वनविभागाच्या नव्या दिशेने वाटचालीकडे आशेने पाहत आहेत.
बालपण अकोला येथे घालवलेल्या आणि सध्या नागपूरच्या रहिवासी असलेल्या दिपालीताई तलमले या कृषी शाखेतील पदव्युत्तर (M.Sc.) पदवीधर असून, २००७ साली त्यांनी विक्रीकर निरीक्षक म्हणून शासकीय सेवेला प्रारंभ केला होता. त्यानंतर २००८ साली राज्य वनसेवेच्या सहाय्यक वनसंरक्षक पदावर निवड होऊन, कोइंबतूर येथील २००९–११ या कालावधीत प्रशिक्षण पूर्ण केले.
त्यानंतर त्यांनी नागपूर, पेंच व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर, जैवविविधता मंडळ, व मुख्य वनसंरक्षक कार्यालय अशा विविध पदांवर कार्यरत राहताना प्रशासकीय, संरक्षणात्मक आणि योजना अंमलबजावणी या तिन्ही पातळ्यांवर ठसा उमठवला. त्यांच्या कार्यशैलीत शिस्त, पारदर्शकता व संवेदनशीलता या बाबी अधोरेखित होत असल्याचे सहकाऱ्यांचे म्हणणे आहे.
त्यांच्या पती राजन तलमले हे सुद्धा वनसेवेत विभागीय वनाधिकारी पदावर नागपूरमध्ये कार्यरत असून, त्यांचे वडील लक्ष्मण वनकर हे निवृत्त सहाय्यक निबंधक आहेत. त्यामुळं त्यांना मिळालेली वैचारिक बैठक आणि घरातील प्रशासकीय पार्श्वभूमी याचा फायदा निश्चितच त्यांना कारभारात होणार आहे.
आलापल्ली वनविभागात सात वनपरिक्षेत्र – आलापल्ली, अहेरी, पिरमीली, पेडीगुड्डम, मार्कंडा, घोट आणि चामोर्शी यांचा समावेश होतो. या भागात सागवानासह विविध मौल्यवान वनसंपत्ती आढळते. परंतु गेल्या काही वर्षांत ढिसाळ प्रशासन, वाढती अवैध वृक्षतोड, उत्खनन, आणि निलंबित वनाधिकाऱ्यांची संख्या यांमुळे विभागाची प्रतिमा मलिन झाली होती.
या पार्श्वभूमीवर उपवनसंरक्षक दिपाली तलमले यांच्यासमोर काही मोठी आव्हानं असणार आहेत. विशेषतः नक्षलग्रस्त भागातील योजनांची अंमलबजावणी, अवैध कृत्यांवर नियंत्रण, वनसंवर्धन, आणि स्थानिकांमध्ये जनजागृती यावर भर देण्याची गरज आहे. त्यांचा अध्यापनातील अनुभव आणि संवाद कौशल्य याचा उपयोग स्थानिक जनतेशी समन्वय साधताना मोलाचा ठरेल.
सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी सांगितले की, “दिपाली तलमले यांचं नेतृत्व हे पारदर्शक व लोकाभिमुख असणार याबाबत खात्री आहे. त्यांनी जनतेचा सहभाग घेऊन वनविकास, पर्यटन आणि रोजगार यामध्ये समन्वय साधला तर हे नेतृत्व ऐतिहासिक ठरेल.”
विशेष म्हणजे आलापल्ली वनविभागाच्या स्थापनेनंतर उपवनसंरक्षक पदावर कार्य करणाऱ्या त्या दुसऱ्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. याआधी श्रीमती गिन्नी सिंह या महिला अधिकारी या पदावर कार्यरत होत्या.
स्थानिक जनतेसह पर्यावरण क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना दिपाली तलमले यांच्या नियुक्तीमुळे नव्या पर्वाची सुरुवात वाटते आहे. भविष्यात वनसंवर्धन आणि पर्यटन विकास यांचे सुव्यवस्थित नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे