गडचिरोली संदीप राचर्लवार दिनांक:-29/06/2025
गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या नक्षलविरोधी मोहिमेला पुन्हा एकदा मोठे यश मिळाले आहे. कवंडे जंगल परिसरात घातपाताच्या उद्देशाने रेकी करत असलेल्या जहाल माओवादी उपकमांडरला गडचिरोली पोलिसांच्या विशेष पथकाने व सीआरपीएफच्या ३७ बटालियनने संयुक्त कारवाई करत अटक केली. हा माओवादी म्हणजे अंकल ऊर्फ मन्नू सुलगे पल्लो (२८ वर्षे), रा. कवंडे, ता. भामरागड, जि. गडचिरोली, ज्याच्यावर ६ लाख रुपयांचे बक्षीस महाराष्ट्र शासनाने जाहीर केले होते.
ही अटक म्हणजे केवळ एका माओवादी कार्यकर्त्याचा शरणागती नाही, तर जिल्ह्यातील घातपाताच्या संभाव्य योजनांचा आणि पोलिसांवरील संभाव्य हल्ल्यांचा मोठा कट उधळून लावण्याचे पोलीस यंत्रणेचे यश आहे.
—कवंडे जंगल परिसरात सुरू होती घातपाताची तयारी
२७ जून रोजी भामरागड उपविभागातील नव्याने स्थापन झालेल्या कवंडे पोलीस पोस्टच्या हद्दीत विशेष गस्तीदरम्यान, पोलिसांना एका संशयित व्यक्तीच्या हालचाली दिसल्या. त्यास ताब्यात घेऊन गडचिरोली येथे आणून सखोल चौकशी केल्यानंतर उघडकीस आले की तो पोलीस अभिलेखातील जहाल माओवादी उपकमांडर आहे.
जांभूळखेडा हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार
याच व्यक्तीचा संबंध १ मे २०१९ रोजी कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा जंगल परिसरात १५ पोलीस जवानांचा बळी घेणाऱ्या भीषण भूसुरुंग स्फोटाशी असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. या स्फोटात गडचिरोलीच्या पोलीस दलाचे कर्तव्यदक्ष जवान शहीद झाले होते. त्यामागे असलेल्या कटकारस्थानाचा एक महत्त्वाचा सदस्य म्हणून मन्नू सुलगे याचे नाव पुन्हा समोर आले आहे.
कसून चौकशी; जुने गुन्हे उघड
सदर अटकेतील माओवादीवर यापूर्वी पोस्टे पुराडा येथे दाखल अप. क्र. ११/२०२१ अंतर्गत चकमक व खूनाचे एकूण ५ गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे, २९ मार्च २०२१ रोजी खोब्रामेढा जंगल परिसरात झालेल्या चकमकीच्या घटनेवरून त्याचे नाव प्रथम समोर आले होते.
दलममधील प्रवास
२०१२–२०१७: छत्तीसगडमधील निब कंपनीत माओवादी सदस्य२०१७: भामरागड दलममध्ये नियुक्ती०
20१७–२०२०: कोरची दलममध्ये उपकमांडर
२०२० पासून: महाराष्ट्र–छत्तीसगड सीमेवरील कवंडे जंगलात लपून हालचाली
हा माओवादी गेली अनेक वर्षे जंगलात लपून राहत पोलिसांवर टेहळणी, रेकी, आणि घातपात घडविण्याचे नियोजन करत होता. त्याची अटक म्हणजे अनेक संभाव्य हल्ल्यांना रोखण्याचे महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.
––हीरो ऑफ ऑपरेशन – गडचिरोली पोलीस
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. त्यांच्या आदेशाने विशेष पोलीस पथक, पोउपनि. मंदार शिंदे यांच्या नेतृत्वातील कवंडे पोस्टचे अधिकारी व जवान, सीआरपीएफ ३७ बटालियनचे कमांडंट दाओ इंजिरकान कींडो, तसेच अनेक वरिष्ठ अधिकारी – संदीप पाटील (विशेष पोलीस महानिरीक्षक, नक्षलविरोधी अभियान), अंकित गोयल (पोलीस उपमहानिरीक्षक), एम. रमेश, सत्य साई कार्तिक, विशाल नागरगोजे, अमर मोहिते, रवींद्र भोसले – यांच्या मार्गदर्शनात पार पडली.
-
—“हिंसेचा मार्ग सोडा” – पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे आवाहन
या यशानंतर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की, “गडचिरोली पोलिसांची माओवादी कारवायांवरील पकड बळकट होत आहे. माओवादी चळवळ ही आता जनाधार गमावत आहे. हिंसेचा मार्ग सोडून आत्मसमर्पण करा. सरकारच्या पुनर्वसन योजनांचा लाभ घ्या. आम्ही सन्मानाने जगण्यासाठी तुमच्या पाठीशी आहोत.”
—नव्या पोस्टांची फळं मिळू लागली
भामरागडसारख्या दुर्गम भागात स्थापन झालेल्या नव्या पोलीस पोस्टांनी स्थानिक सुरक्षेला नवी दिशा दिली आहे. कवंडे पोलीस पोस्ट ही त्याचे ठळक उदाहरण आहे, जिथे झालेल्या पहिल्याच महत्त्वपूर्ण कारवाईने माओवाद्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले आहे.
–गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात गेल्या काही वर्षांपासून गडचिरोली पोलीस दल, सीआरपीएफ आणि वनविभाग यांच्या संयुक्त प्रयत्नांतून शांतता प्रस्थापित करण्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. अशा कारवायांमुळे माओवाद्यांच्या मनोबलावर घाव बसत असून, प्रशासनाचा ‘सॉफ्ट टच विथ हार्ड एक्शन’चा दृष्टिकोन प्रभावी ठरत आहे.