आलापल्ली, विशेष प्रतिनिधी दिनांक:- 25 ऑगस्ट 2026
गडचिरोली जिल्ह्याला लाभलेली समृद्ध वनसंपदा आणि दर्जेदार सागवान केवळ कच्च्या स्वरूपात न राहता त्यावर स्थानिक पातळीवर प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन व्हावे, तसेच स्थानिक महिला व युवकांना कौशल्याच्या माध्यमातून रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने आलापल्ली येथे उभारण्यात आलेले ‘प्रगत काष्ठ प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्र’ जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देणारे ठरणार आहे. या केंद्रामुळे गडचिरोलीच्या काष्ठ प्रक्रियेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळणार असून महिलांच्या आर्थिक आत्मनिर्भरतेलाही मोठे बळ मिळेल, असा विश्वास जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी व्यक्त केला.
जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजना २०२४-२५ अंतर्गत महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या शासकीय आरा गिरणी, आलापल्ली येथे तब्बल १ कोटी ५९ लाख रुपये निधीतून उभारण्यात आलेल्या या अत्याधुनिक केंद्राचे लोकार्पण जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते करण्यात आले. केंद्रात आधुनिक काष्ठ प्रक्रिया यंत्रसामग्री, फर्निचर निर्मितीसाठी आवश्यक सुविधा, फिनिशिंगची व्यवस्था तसेच प्रशिक्षणार्थींसाठी स्वतंत्र प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
लोकार्पणप्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी पंडा यांनी सांगितले की, गडचिरोली जिल्ह्याची ओळख ही वनसंपदेने समृद्ध जिल्हा म्हणून आहे. जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या सागवानासह इतर काष्ठसंपदेवर स्थानिक पातळीवर प्रक्रिया आणि मूल्यवर्धन झाल्यास त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होऊ शकते. कच्च्या मालाचे तयार उत्पादनात रूपांतर झाल्याने स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल. आधुनिक तंत्रज्ञान, कौशल्य प्रशिक्षण आणि बाजारपेठ यांची सांगड घातल्यास या केंद्रातून स्थानिक युवक आणि महिलांसाठी रोजगाराच्या अनेक नव्या वाटा खुल्या होऊ शकतात.
पुरुषप्रधान क्षेत्रात महिलांची कौशल्यपूर्ण आगेकूच
काष्ठकाम आणि कारपेंटरीचे क्षेत्र पारंपरिकदृष्ट्या पुरुषप्रधान मानले जाते. मात्र, आलापल्ली येथील या केंद्रातून प्रशिक्षण घेतलेल्या महिलांनी हा समज खोटा ठरवत काष्ठकामात आपले कौशल्य सिद्ध केले आहे. महिलांनी प्रशिक्षणादरम्यान टेबल, ट्रे तसेच विविध प्रकारच्या काष्ठ वस्तू तयार करून दाखविल्या आहेत. त्यामुळे योग्य प्रशिक्षण आणि संधी मिळाल्यास महिला कोणत्याही क्षेत्रात आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकतात, हे या केंद्राच्या माध्यमातून स्पष्ट झाले आहे.
महिलांना केवळ प्रशिक्षण देऊन उपक्रम थांबविण्याऐवजी त्यांना नियमित रोजगार, स्वयंरोजगार, उत्पादननिर्मितीसाठी आवश्यक सहकार्य आणि तयार उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशिक्षणातून मिळालेले कौशल्य प्रत्यक्ष उत्पन्नाच्या साधनात रूपांतरित करण्याची संधी महिलांना मिळणार आहे.
गडचिरोलीच्या सागवानाला स्थानिक मूल्यवर्धनाची जोड
गडचिरोलीचा सागवान दर्जेदार आणि देशभरात मागणी असलेला आहे. विविध ऐतिहासिक आणि महत्त्वाच्या प्रकल्पांमध्येही गडचिरोलीच्या सागवानाचा वापर करण्यात आला आहे. मात्र, कच्च्या स्वरूपातील वनसंपदेऐवजी त्याच्यावर जिल्ह्यातच आधुनिक पद्धतीने प्रक्रिया करून फर्निचर आणि अन्य दर्जेदार काष्ठ उत्पादने तयार करण्याची संधी या केंद्रामुळे निर्माण झाली आहे.
आधुनिक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने काष्ठ कापणी, आकार देणे, प्रक्रिया, फर्निचर निर्मिती आणि फिनिशिंग याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे स्थानिक युवक आणि महिलांना आधुनिक काष्ठ उद्योगासाठी आवश्यक कौशल्य आत्मसात करता येणार असून भविष्यात गडचिरोलीच्या काष्ठ उत्पादनांना स्वतंत्र बाजारपेठ निर्माण करण्याची शक्यता वाढणार आहे.
प्रशिक्षणापासून बाजारपेठेपर्यंतची साखळी
या केंद्राची दीर्घकालीन उपयुक्तता आणि शाश्वतता टिकवून ठेवण्यासाठी केवळ प्रशिक्षणावर भर न देता प्रशिक्षण–उत्पादन–बाजारपेठ–उत्पन्न अशी संपूर्ण साखळी उभारण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. केंद्रात तयार होणाऱ्या फर्निचर व काष्ठ वस्तूंचा उपयोग आश्रमशाळा, शासकीय कार्यालये आणि विविध संस्थांच्या गरजांशी जोडण्याबरोबरच नागपूर विभागातील बाजारपेठांमध्येही करण्याचे नियोजन आहे.
यामुळे स्थानिक पातळीवर तयार होणाऱ्या उत्पादनांना निश्चित बाजारपेठ मिळण्यास मदत होईल. त्यातून प्रशिक्षित महिलांना नियमित उत्पन्नाचा स्रोत निर्माण होऊ शकतो आणि केंद्राच्या माध्यमातून स्वयंरोजगाराचे नवे मॉडेल विकसित होण्याची शक्यता आहे.
काही महिन्यांत उभारले अत्याधुनिक केंद्र
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक गणेश मोटकर यांनी केंद्राच्या उभारणीची माहिती दिली. जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेतून उपलब्ध झालेल्या १ कोटी ५९ लाख रुपयांच्या निधीतून आधुनिक यंत्रसामग्री, शेड आणि प्रशिक्षणासाठी आवश्यक सुविधा उभारण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शन आणि सहकार्यामुळे अवघ्या काही महिन्यांत या केंद्राची उभारणी पूर्ण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
प्रशिक्षित महिला कारपेंटरचा विशेष गौरव
केंद्रातून प्रशिक्षण पूर्ण करून प्रत्यक्ष फर्निचर आणि विविध काष्ठ उत्पादने तयार करणाऱ्या महिलांचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला. मुक्ताबाई भुपेलीवार, कविता मुळकरी, संध्या ठाकरे, राजलक्ष्मी पोपेली आणि लक्ष्मी पेदी यांचा जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या महिलांनी प्रशिक्षणादरम्यान आत्मसात केलेले कौशल्य प्रत्यक्ष उत्पादनांच्या माध्यमातून दाखवून दिले. त्यामुळे केंद्राचा उद्देश केवळ प्रशिक्षणापुरता मर्यादित नसून महिलांना कौशल्य, आत्मविश्वास आणि उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे.
लोकार्पणानंतर जिल्हाधिकारी पंडा आणि उपस्थित मान्यवरांनी केंद्रातील अत्याधुनिक यंत्रसामग्रीची पाहणी केली. प्रशिक्षणार्थी महिलांनी तयार केलेल्या टेबल, ट्रे आणि विविध काष्ठ उत्पादनांची माहिती त्यांनी घेतली. महिलांच्या कामाचे आणि उत्पादनांच्या दर्जाचे कौतुक करत केंद्राचा अधिकाधिक महिलांनी आणि युवकांनी लाभ घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
यावेळी प्रादेशिक व्यवस्थापक दिव्याभारती, उपवनसंरक्षक शैलेश मीना, सहायक जिल्हाधिकारी अजय डोके, उपविभागीय अधिकारी प्रशांत पिसाळ, तहसीलदार बालाजी सोमवंशी, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी रमेश पेरगू, संशोधन अधिकारी श्री. हटवार यांच्यासह महाराष्ट्र वनविकास महामंडळ व वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच प्रशिक्षणार्थी महिला उपस्थित होत्या.
गडचिरोलीच्या वनसंपदेला आधुनिक तंत्रज्ञान, स्थानिक कौशल्याला रोजगार आणि महिलांच्या हाताला आर्थिक बळ देणारे आलापल्लीचे हे केंद्र भविष्यात जिल्ह्याच्या काष्ठ उद्योगाची नवी ओळख निर्माण करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरण्याची अपेक्षा आहे.

