गडचिरोली, विशेष प्रतिनिधी ऑगस्ट दिनांक : 25 ऑगस्ट 2026
गडचिरोली जिल्ह्यात अवैध व्यवसाय तसेच गैरकायदेशीर वाहतुकीविरोधात पोलिसांनी कठोर कारवाईची मोहीम सुरू ठेवली असून, कुरखेडा तालुक्यात अवैधरित्या गोवंशीय जनावरांची वाहतूक करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखा आणि कुरखेडा पोलिसांनी संयुक्तपणे धडक कारवाई केली आहे. गेवर्धा ते केशोरी मार्गावर पोलिसांनी सापळा रचून दोन संशयित चारचाकी वाहने अडवून त्यांची तपासणी केली असता, दोन्ही वाहनांमध्ये एकूण १९ गोवंशीय जनावरे अत्यंत निर्दयतेने कोंबून वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. या कारवाईत १९ गोवंशीय जनावरे, एक ट्रक आणि एक महिंद्रा बोलेरो पिकअप अशी एकूण १९ लाख ६५ हजार रुपयांची मालमत्ता पोलिसांनी जप्त केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील काही असामाजिक घटकांकडून विविध अवैध प्रकार करण्याचा प्रयत्न केला जात असतो. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. विशेषतः अवैधरित्या गोवंशीय जनावरांची वाहतूक व विक्री करणाऱ्यांवर लक्ष ठेवून संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि कुरखेडा पोलीस सक्रिय झाले होते.
दि. २४ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास कुरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गेवर्धा ते केशोरी मार्गावर दोन वाहनांमधून अवैधरित्या गोवंशीय जनावरांची वाहतूक केली जाणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि कुरखेडा पोलिसांच्या पथकाने गेवर्धा गावाजवळ सापळा रचून पाळत ठेवली. काही वेळाने गेवर्धा ते केशोरी मार्गावर दोन वाहने संशयास्पदरीत्या येताना पोलिसांच्या निदर्शनास आली. पोलिसांनी तात्पुरता अडथळा निर्माण करून दोन्ही वाहने थांबवली आणि पंचांसमक्ष त्यांची तपासणी केली.
तपासणीदरम्यान ट्रक क्रमांक टीजी १२ यू ४८९६ या अशोक लेलँड वाहनामध्ये ११ गायी आणि २ बैल, अशी एकूण १३ गोवंशीय जनावरे आढळून आली. या जनावरांची अंदाजे किंमत १ लाख ८५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या वाहनाचा चालक शेख इब्राहिम शेख इस्माईल, वय ४० वर्षे, रा. मेहबुब नगर, पिली नदी, उप्पलवाडी, नागपूर, हा असल्याचे समोर आले. त्याचप्रमाणे एमएच ३५ एजे ४६०१ क्रमांकाच्या महिंद्रा बोलेरो पिकअप वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये ४ गायी आणि २ बैल, अशी एकूण ६ गोवंशीय जनावरे आढळून आली. या जनावरांची अंदाजे किंमत ८० हजार रुपये असून, सदर वाहनाचा चालक मुफस्सील कुरेशी मोहम्मद जमील कुरेशी, वय २५ वर्षे, रा. चिराग अली चौक, टेका नई बस्ती, नागपूर, असल्याचे निष्पन्न झाले.
दोन्ही वाहनांमध्ये एकूण १९ गोवंशीय जनावरे आढळून आली. त्यांची अंदाजे किंमत २ लाख ६५ हजार रुपये असून, जनावरांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या अशोक लेलँड ट्रकची अंदाजे किंमत १२ लाख रुपये आणि महिंद्रा बोलेरो पिकअप वाहनाची अंदाजे किंमत ५ लाख रुपये आहे. अशाप्रकारे पोलिसांनी एकूण १९ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे, गोवंशीय जनावरांची वाहतूक करण्यासाठी आवश्यक परवाना अथवा वैध कागदपत्रे आरोपींकडे आढळून आली नाहीत. तसेच जनावरांना वाहनांमध्ये अत्यंत निर्दयतेने कोंबून वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांच्या तपासणीत स्पष्ट झाले.
या प्रकरणी शेख इब्राहिम शेख इस्माईल आणि मुफस्सील कुरेशी मोहम्मद जमील कुरेशी या दोन्ही आरोपींविरुद्ध कुरखेडा पोलीस ठाण्यात अप. क्र. १९१/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० मधील कलम ११(१)(अ), ११(१)(ड), ११(१)(इ), महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ मधील कलम ५(अ), ५(ब), ९ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३(५) अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे आणि कुरखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली स्थागुशाचे पोउपनि. विश्वंबर कराळे, पोअं. तुषार खोब्रागडे, चापोअं. गणेश तसेच कुरखेडा पोलीस ठाण्याचे परि. पोउपनि. कुणाल रेगुलवार, पोहवा अजीतकुमार सुरजुसे आणि नापोअं. अमोल आलाम यांनी ही कारवाई केली.
गडचिरोली जिल्ह्यात अवैध गोवंश वाहतुकीचे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने कारवाई केली जात असून, गेवर्धा-केशोरी मार्गावर करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अवैध गोवंश वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे रात्रीच्या अंधारात सुरू असलेली गोवंश वाहतुकीची ही हालचाल उघडकीस आली असून, जप्त करण्यात आलेल्या १९ जनावरांसह वाहनांवरही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
विदर्भ न्यूज २४ नेटवर्क

