सिरोंचा विशेष प्रतिनिधी दिनांक :25 नोव्हेंबर 2026
शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळावा, वर्षभर कष्ट करून पिकवलेल्या धानाला शासनाकडून न्याय मिळावा आणि शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवू नये, या प्रामाणिक भावनेतून सिरोंचा तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने चंद्रपूर येथे धाव घेतली. आपल्या शेतकरी बांधवांच्या प्रश्नासाठी एकजुटीने पुढाकार घेत शिष्टमंडळाने नियोजन भवन, चंद्रपूर येथे माजी मंत्री तथा आमदार मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.
सिरोंचा तालुक्यात यावर्षी शासकीय धान खरेदीसाठी प्रतिएकर केवळ ९ क्विंटलची मर्यादा निश्चित करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. प्रत्यक्षात अनेक शेतकरी प्रतिएकर २० ते २५ क्विंटलपर्यंत धानाचे उत्पादन घेत असताना शासनाकडून केवळ ९ क्विंटल धान खरेदी केले जात असल्याने उर्वरित धान खासगी व्यापाऱ्यांना कमी दरात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येण्याची भीती निर्माण झाली आहे.
वर्षभर शेतात राबायचे, कर्ज काढून शेती करायची, बियाणे, खते, औषधे, मजुरी आणि सिंचनासाठी खर्च करायचा आणि शेवटी पिकवलेल्या धानाला योग्य मोबदला मिळणार नसेल, तर शेतकऱ्यांनी जगायचे कसे? हा प्रश्न घेऊनच शेतकरी प्रतिनिधींनी सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्यासमोर आपली व्यथा मांडली.
यावेळी प्रतिएकर ९ क्विंटलची मर्यादा तातडीने वाढवून मागील वर्षाप्रमाणे १२.६० क्विंटल किंवा सिरोंचा तालुक्यातील प्रत्यक्ष उत्पादनाचा विचार करून किमान २० ते २५ क्विंटलपर्यंत शासकीय धान खरेदी करण्याची मागणी करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद!
शेतकऱ्यांनी मांडलेली परिस्थिती आणि त्यांच्या मागण्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. संबंधित विभागाचे मंत्री तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी स्वतः थेट चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
तसेच, “मी सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे,” असे आश्वासन देत शेतकऱ्यांना दिलासा दिला.
या भेटीमुळे सिरोंचा तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीला एक नवी दिशा मिळाली असून, आता शासनाकडून ठोस निर्णय होण्याची अपेक्षा शेतकरी बांधवांमध्ये निर्माण झाली आहे.
ही केवळ धान खरेदीची मर्यादा वाढविण्याची मागणी नाही, तर शेतकऱ्यांच्या कष्टाला न्याय मिळवून देण्याची लढाई आहे!
सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी एकत्र आलेल्या शिष्टमंडळाने आपली भूमिका ठामपणे मांडत ही भेट यशस्वीपणे पार पाडली. यावेळी नारायणपूर परिसरातील विविध गावांतील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आता शेतकऱ्यांच्या नजरा शासनाच्या निर्णयाकडे लागल्या आहेत. शेतकऱ्यांच्या पदरात केवळ आश्वासन नव्हे, तर प्रत्यक्ष दिलासा देणारा निर्णय पडावा, हीच सर्वांची अपेक्षा आहे.
शेतकऱ्यांचा घाम वाया जाऊ नये, त्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळावा आणि सिरोंचा तालुक्यातील धान उत्पादकांना न्याय मिळावा, हीच या शिष्टमंडळाच्या प्रयत्नांमागील खरी भावना आहे.
