गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक : 12 नोव्हेंबर 2026
आदिवासी संस्कृती, परंपरा, अस्मिता आणि जल-जंगल-जमिनीच्या रक्षणासाठी ऐतिहासिक संघर्ष करणाऱ्या जननायकांच्या गौरवाला राष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा मिळवून देणारा महत्त्वपूर्ण सोहळा यंदा गडचिरोली जिल्ह्यात आयोजित करण्यात येत आहे. भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त साजरा होणाऱ्या राष्ट्रीय जनजातीय गौरव दिनाच्या मुख्य राष्ट्रीय कार्यक्रमाचे यजमानपद गडचिरोली जिल्ह्याला मिळाले असून, १३ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक सोहळ्यामुळे आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्याच्या सांस्कृतिक वैभवाला राष्ट्रीय व्यासपीठ मिळणार आहे.
१५ नोव्हेंबर १८७५ रोजी जन्मलेल्या भगवान बिरसा मुंडा यांनी ब्रिटिश सत्तेच्या अन्यायकारक धोरणांविरोधात आदिवासी समाजाला संघटित करून ‘उलगुलान’ अर्थात महान जनआंदोलन उभे केले. जल, जंगल आणि जमिनीवरील आदिवासींचे पारंपरिक अधिकार अबाधित राहावेत, त्यांच्या संस्कृतीचे संरक्षण व्हावे आणि शोषणकारी व्यवस्थेविरोधात समाजाने एकजुटीने लढा द्यावा, यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. अवघ्या २५ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी आदिवासी समाजाच्या मनात स्वाभिमान, संघर्ष आणि स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित केली. त्यांच्या या महान कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेत केंद्र सरकारने २०२१ पासून १५ नोव्हेंबर हा दिवस ‘जनजातीय गौरव दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.
यंदाच्या राष्ट्रीय सोहळ्याचे विशेष महत्त्व म्हणजे आदिवासी संस्कृती आणि जीवनपद्धतीचे जिवंत प्रतिबिंब असलेल्या गडचिरोली जिल्ह्याची या आयोजनासाठी झालेली निवड. जिल्ह्यातील आदिवासी समाजाचे जीवन जल, जंगल आणि जमिनीशी अतूटपणे जोडलेले आहे. वनसंपत्तीवर आधारित उपजीविका, पारंपरिक शेती, निसर्गाविषयीचे ज्ञान, स्थानिक कला आणि समृद्ध लोकपरंपरा ही जिल्ह्याची वैशिष्ट्ये आहेत. गोंडी आणि माडिया भाषांमधून जपली गेलेली सांस्कृतिक ओळख, लोकगीते, पारंपरिक वाद्ये आणि ‘रेला’ नृत्य यांसारख्या लोककलांमधून आदिवासी समाजाचे जीवनविश्व अनुभवायला मिळते. या राष्ट्रीय मंचाच्या माध्यमातून या परंपरांना व्यापक ओळख मिळण्याची संधी निर्माण झाली आहे.
१५ नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित मुख्य राष्ट्रीय कार्यक्रमाचे उद्घाटन आणि संबोधन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हर्च्युअल माध्यमातून करणार आहेत. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय आदिवासी कार्यमंत्री जुएल ओराम, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे या सोहळ्याकडे संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे.
या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या निमित्ताने केवळ सांस्कृतिक प्रदर्शन किंवा औपचारिक अभिवादन एवढ्यापुरते आयोजन मर्यादित न ठेवता आदिवासी समाजातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासनाच्या विविध कल्याणकारी योजना पोहोचविण्यावरही विशेष भर देण्यात आला आहे. १३ ते १८ नोव्हेंबरदरम्यान सेवा सप्ताहाचे आयोजन करून केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची माहिती, लाभ वितरण, कागदपत्रांची पूर्तता, आरोग्यविषयक मार्गदर्शन, शिक्षण, रोजगार आणि आर्थिक स्वावलंबनासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान, प्रधानमंत्री जनमन योजनेसह विविध योजनांच्या माध्यमातून पात्र कुटुंबांना लाभ मिळवून देणे, स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन करणे, आधार अद्ययावत करणे, आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी मदत करणे, कृषीविषयक सेवांची माहिती देणे, आरोग्य तपासणी शिबिरे, सिकलसेल जनजागृती, माता-बाल आरोग्य आणि पोषणविषयक कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. याशिवाय आदिवासी स्मारकांची स्वच्छता, दीपोत्सव, भगवान बिरसा मुंडा आदिवासी सेवक पुरस्कार वितरण, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, जात वैधता प्रमाणपत्र, व्यावसायिक शिक्षण, कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन असे विविध उपक्रम या सेवा सप्ताहात आयोजित करण्यात येणार आहेत.
२०११ च्या जनगणनेनुसार गडचिरोली जिल्ह्यात अनुसूचित जमातीची लोकसंख्या ४ लाख १५ हजार ३०६ इतकी असून, ती जिल्ह्याच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे ३८.७० टक्के आहे. ही आकडेवारी जिल्ह्याच्या आदिवासीबहुल स्वरूपाची आणि येथील सामाजिक-सांस्कृतिक रचनेतील आदिवासी समाजाच्या महत्त्वपूर्ण स्थानाची साक्ष देते. त्यामुळे राष्ट्रीय जनजातीय गौरव दिनाच्या मुख्य सोहळ्यासाठी गडचिरोलीची झालेली निवड ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.
भगवान बिरसा मुंडा यांनी दाखविलेल्या मार्गावर चालताना आदिवासी समाजाच्या पारंपरिक अधिकारांचा सन्मान, संस्कृतीचे संवर्धन, शिक्षणाचा प्रसार, आरोग्य सुविधा, रोजगाराच्या संधी आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात सन्मानपूर्वक सहभाग या बाबींना प्राधान्य देणे आवश्यक आहे. राष्ट्रीय जनजातीय गौरव दिनाचा हा सोहळा केवळ एका महान क्रांतिकारकाच्या स्मृतींना अभिवादन करणारा कार्यक्रम न ठरता आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी नव्या संकल्पनांना आणि संधींना दिशा देणारा ठरावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

आदिवासी अस्मिता, ऐतिहासिक संघर्ष, समृद्ध संस्कृती आणि विकासाची आकांक्षा यांचा संगम घडविणारा हा राष्ट्रीय सोहळा गडचिरोलीच्या इतिहासात निश्चितच एक महत्त्वपूर्ण पर्व ठरणार आहे. भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांना कृतीतून आदरांजली अर्पण करत आदिवासी समाजाला सन्मान, अधिकार आणि विकासाच्या समान संधी उपलब्ध करून देणे, हीच या गौरव दिनाची खरी सार्थकता ठरणार आहे.


