गडचिरोली विशेष प्रतिनिधी दिनांक:-08 नोव्हेंबर 2026
गडचिरोली जिल्ह्यात माओवादी कारवायांना आळा बसल्यानंतर आता जिल्ह्यात सुरक्षित आणि भयमुक्त वातावरण निर्माण करण्यावर गडचिरोली पोलीस दलाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. याच अनुषंगाने माओवाद्यांनी पूर्वीच्या काळात जंगल परिसरात जमिनीखाली लपवून ठेवलेला स्फोटक साहित्याचा साठा शोधून काढण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. ४ नोव्हेंबर २०२६ रोजी गॅरापत्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टव्वे जंगल परिसरात राबविण्यात आलेल्या विशेष शोधमोहीमेदरम्यान मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्य आणि इतर माओवादी साहित्य जप्त करण्यात आले.
भूतकाळात सुरक्षा दलांना लक्ष्य करण्यासाठी तसेच घातपाताच्या कारवाया घडवून आणण्यासाठी माओवाद्यांकडून विविध प्रकारची शस्त्रे आणि स्फोटक साहित्य वापरले जात होते. आंतरराज्यीय सीमावर्ती भागातील दुर्गम जंगलांचा फायदा घेत माओवादी हे साहित्य तयार करून गोपनीय पद्धतीने जमिनीखाली लपवून ठेवत असत. नक्षल सप्ताह, निवडणुका तसेच इतर महत्त्वाच्या प्रसंगी सुरक्षा दलांवर घातपात करण्याच्या उद्देशाने या साहित्याचा वापर केला जात असल्याची माहिती आहे.
दरम्यान, गॅरापत्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टव्वे जंगल परिसरात माओवाद्यांनी स्फोटक साहित्य लपवून ठेवल्याची गोपनीय माहिती गडचिरोली पोलीस दलाला प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली ४ नोव्हेंबर रोजी विशेष अभियान आखण्यात आले. यासाठी गडचिरोली विशेष अभियान पथक आणि प्राणहिता येथील चार तुकड्या तसेच बॉम्ब शोधक व नाशक पथकाची (BDDS) दोन पथके जंगल परिसरात रवाना करण्यात आली.
विशेष अभियान पथकाने जंगल परिसरात शोधमोहीम राबविली. यावेळी बीडीडीएस पथकाच्या जवानांनी परिसराची कसून तपासणी केली असता जमिनीत लपवून ठेवलेला स्फोटक साहित्याचा साठा आढळून आला. पोलिसांनी सुरक्षित पद्धतीने सदर साहित्य ताब्यात घेतले.
या कारवाईत स्फोटकांसाठी वापरण्यात येणारे ११ कुकर, कॉर्टेक्स वायरचे तीन बंडल, एकूण १०० फूट वायर, तीन किलो गनपावडर, चार डेटोनेटर, १२ व्होल्टची एक बॅटरी, २५० ग्रॅम फटाका दारू, चार स्टील कंटेनर, आठ वायर बंडल, एक सोलर प्लेट आणि इतर माओवादी साहित्य जप्त करण्यात आले. जंगलाच्या दुर्गम भागात जमिनीखाली लपवून ठेवलेला हा साहित्यसाठा शोधून काढल्याने संभाव्य घातपाताचा धोका टाळण्याच्या दृष्टीने पोलिसांच्या या कारवाईला महत्त्व प्राप्त झाले आहे.
गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम आणि सीमावर्ती भागात पूर्वी माओवादी संघटनांकडून सुरक्षा दलांच्या हालचालींना अडथळा निर्माण करण्यासाठी तसेच घातपाताच्या घटना घडविण्यासाठी अशा प्रकारचे साहित्य लपवून ठेवले जात होते. माओवादाचा प्रभाव कमी झाल्यानंतरही जंगल परिसरात पूर्वी लपवून ठेवलेले साहित्य अस्तित्वात असण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस दलाकडून शोधमोहीम राबविण्यात येत आहे. अशा साहित्याचा शोध घेऊन ते सुरक्षितरीत्या ताब्यात घेणे, नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करणे आणि जिल्ह्यात शांततापूर्ण वातावरण टिकवून ठेवणे या उद्देशाने पोलीस दलाच्या हालचाली सुरू आहेत.
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली पार पडली. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता) हर्षवर्धन बी. जे. तसेच पोलीस उपअधीक्षक (अभियान) सुनील उईके यांच्या देखरेखीखाली गडचिरोली विशेष अभियान पथक, प्राणहिता पथक, इंटेलिजन्स सेल आणि बीडीडीएस पथकातील जवानांनी ही मोहीम यशस्वीरीत्या पार पाडली. या कारवाईत सहभागी झालेल्या सर्व अधिकारी आणि जवानांचे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी कौतुक केले आहे.
माओवादाच्या दहशतीतून मुक्त झालेल्या गडचिरोली जिल्ह्यात कायमस्वरूपी शांतता, सुरक्षितता आणि विकासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी पोलीस दलाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. जंगल परिसरात लपवून ठेवलेल्या स्फोटक साहित्याचा शोध घेऊन त्याचा संभाव्य धोका दूर करण्याच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांची सतर्कता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.


