सिरोंचा, विशेष प्रतिनिधी दिनांक:- 01 नोव्हेंबर 2026
सिरोंचा तालुक्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी रविवारी तालुक्यातील विविध विकासकामे, शैक्षणिक संस्था आणि पायाभूत सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी स्थानिक परिस्थिती जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांकडून विविध विकासकामांची माहिती घेतली.
वडदम येथील ऐतिहासिक जीवाश्म उद्यानाला मुख्य सचिवांनी भेट देऊन तेथील भूवैज्ञानिक वारशाची पाहणी केली. या परिसरातील जीवाश्मांचे योग्य पद्धतीने संवर्धन करून वडदमला पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. जीवाश्म उद्यानाचा पर्यटनदृष्ट्या विकास झाल्यास परिसरातील स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासह सिरोंचा तालुक्याच्या पर्यटनाला चालना मिळू शकते, यावरही यावेळी चर्चा झाली.
वडदम येथील जीवाश्मांशी संबंधित ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता, कोलकाता येथील संग्रहालयात ठेवण्यात आलेले डायनासोरचे जीवाश्म पुन्हा त्यांच्या मूळ परिसरात आणण्याबाबतही मुख्य सचिवांनी चर्चा केली. उद्यान परिसरात त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
विद्यार्थ्यांशी संवाद; शैक्षणिक सुविधांची घेतली माहिती
दौऱ्यात मुख्य सचिवांनी कस्तुरबा गांधी निवासी विद्यालय आणि आदिवासी मुलींच्या आश्रमशाळेला भेट देऊन विद्यार्थिनींशी संवाद साधला. शिक्षणाची गुणवत्ता, शाळेतील उपलब्ध सुविधा, निवास व्यवस्था आणि विद्यार्थ्यांच्या अडचणींबाबत त्यांनी माहिती घेतली.
तुमनूर येथील जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडी केंद्राचीही त्यांनी पाहणी केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रशासनाने लक्ष देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
आशा स्वयंसेविकांच्या अडचणी जाणून घेतल्या
मुख्य सचिवांनी आशा स्वयंसेविकांशी संवाद साधून ग्रामीण भागातील आरोग्यसेवेच्या कामकाजाचा आढावा घेतला. गावपातळीवर आरोग्यविषयक सेवा पोहोचविताना येणाऱ्या अडचणी, प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि आवश्यक सुविधा याबाबत त्यांनी माहिती घेतली.
ग्रामस्थांशी थेट संवाद
तुमनूर येथील ग्रामपंचायत परिसर तसेच फळबागांची पाहणी करताना मुख्य सचिवांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. ग्रामीण भागातील विकासाच्या अपेक्षा, स्थानिक समस्या आणि शासनाकडून अपेक्षित असलेल्या सुविधांची त्यांनी माहिती घेतली.
शासनाच्या विविध कल्याणकारी योजना नागरिकांसाठी उपलब्ध असून पात्र लाभार्थ्यांनी या योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
या दौऱ्यावेळी नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक योगेश कुमार गुप्ता, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मुख्य सचिवांच्या या दौऱ्यामुळे सिरोंचा तालुक्यातील पर्यटन, शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण विकासाच्या प्रश्नांना प्रशासकीय पातळीवर प्रत्यक्ष पाहणीच्या माध्यमातून चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
