गडचिरोली प्रतिनिधी दिनांक : 28 ऑक्टोंबर 2026
गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा एकदा हवामानाचा इशारा देण्यात आला असून, २८ ऑक्टोबर रोजी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रादेशिक मौसम केंद्र, नागपूर यांनी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, तसेच शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीकामाचे नियोजन करावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले आहे.
२८ ऑक्टोबरला ऑरेंज अलर्ट
हवामान विभागाच्या अंदाजानुसार २८ ऑक्टोबर रोजी गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. यासोबतच विजांचा कडकडाट, मेघगर्जना आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे.
ऑरेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवर नदी-नाले, सखल भाग तसेच पाण्याचा प्रवाह वाढू शकणाऱ्या ठिकाणी नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
तारखेनुसार हवामानाचा अंदाज
२७ ऑक्टोबर – येलो अलर्ट :
जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
२८ ऑक्टोबर – ऑरेंज अलर्ट :
जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याबरोबरच ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याचा अंदाज आहे.
२९ ऑक्टोबर – येलो अलर्ट :
बहुतांश ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस, विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
३० ऑक्टोबर :
जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विजांचा कडकडाट होताना नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्यास नागरिकांनी शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे. विजा चमकत असल्यास तात्काळ घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्यावा.
बाल्कनी, छत, घराबाहेरील ओटा तसेच उघड्या दारे-खिडक्यांजवळ उभे राहणे टाळावे. उंच झाडांखाली, धातूच्या मनोऱ्याजवळ तसेच तात्पुरत्या तंबू किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नये.
तारांचे कुंपण, विजेचे खांब आणि लोखंडी वस्तूंपासून सुरक्षित अंतर ठेवावे. पावसाच्या वेळी पाण्यात असल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी जावे.
विजांचा कडकडाट सुरू असताना लँडलाईन फोन आणि विद्युत उपकरणांचा वापर टाळावा. पाण्याचे नळ किंवा पाइपलाइनला स्पर्श करू नये. तसेच अशा वेळी शॉवरखाली आंघोळ करणे टाळावे.
शेतकऱ्यांनीही घ्यावी विशेष खबरदारी
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हवामान विभागाचा अंदाज आणि प्रशासनाकडून मिळणाऱ्या सूचनांकडे लक्ष ठेवून शेतीच्या कामांचे नियोजन करावे. पाऊस आणि वादळी वाऱ्याची शक्यता लक्षात घेता शेतातील साहित्य, यंत्रसामग्री आणि इतर आवश्यक वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची खबरदारी घ्यावी.
प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन
हवामानातील बदल लक्षात घेता नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत यंत्रणांकडून मिळणाऱ्या हवामानविषयक सूचनांवरच विश्वास ठेवावा. संबंधित सर्व शासकीय यंत्रणांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देण्याची तयारी ठेवावी, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने आवाहन केले आहे.
आपत्कालीन परिस्थितीत नियंत्रण कक्षाशी संपर्क साधा
आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.
दूरध्वनी : ०७१३२-२२२०३१ / २२२०३५
मोबाईल : ९४२३९११०७७ / ८२७५३७०५०८ / ८२७५३७०२०८
