सिरोंचा विशेष प्रतिनिधी दिनांक:-14 ऑक्टोंबर 2026
गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आणि सीमावर्ती सिरोंचा तालुक्यात आरोग्यसेवेच्या दृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. किडनीच्या आजाराने त्रस्त रुग्णांना उपचारासाठी मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागू नये, त्यांचा वेळ, पैसा आणि मानसिक त्रास कमी व्हावा, या उद्देशाने स्नेहधर्म चॅरिटेबल हॉस्पिटल अँड डायग्नोस्टिक सेंटर, सिरोंचा येथे डायलिसिस सेंटरचा शुभारंभ आज, बुधवार १४ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे.
सिरोंचा तालुक्यासह अहेरी विधानसभा क्षेत्रातील अनेक दुर्गम गावांमध्ये किडनीच्या आजाराचे रुग्ण उपचारासाठी दूरवर जावे लागण्याच्या समस्येला सामोरे जातात. डायलिसिससारख्या नियमित उपचारासाठी वारंवार प्रवास करणे हे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आर्थिकदृष्ट्या तसेच मानसिकदृष्ट्या मोठे आव्हान असते. अशा परिस्थितीत सिरोंच्यातच डायलिसिसची सुविधा उपलब्ध होणे ही निश्चितच दुर्गम भागातील नागरिकांसाठी दिलासादायक आणि आशादायी बाब मानली जात आहे.
या आरोग्यसेवेची गरज ओळखून मितालीताई आत्राम यांनी पुढाकार घेतल्याने सिरोंचा परिसरातील नागरिकांना अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आरोग्य ही केवळ सुविधा नसून गरजू रुग्णांसाठी जीवनाची आशा आहे, या भावनेतून उभारण्यात आलेले हे केंद्र अनेक कुटुंबांसाठी आधारवड ठरण्याची अपेक्षा आहे.
या डायलिसिस सेंटरचे उद्घाटन माननीय डॉ. राजे धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते होणार असून, विशेष निमंत्रित म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत संघचालक श्री. सुनीलजी मेहर उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रतिमा कॅन्सर इन्स्टिट्यूट, नागपूरचे डॉ. अविनाश टिपणी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
उपचारासाठी शहराची वाट पाहण्याची गरज कमी होणार
आजारी व्यक्तीच्या वेदना केवळ रुग्णापुरत्या मर्यादित राहत नाहीत; त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो. विशेषतः डायलिसिससारख्या नियमित उपचारासाठी दूरच्या शहरात जाण्याची वेळ आली की प्रवासाचा खर्च, उपचाराचा खर्च, वेळ आणि रुग्णाची होणारी शारीरिक गैरसोय यामुळे कुटुंबांवर मोठा ताण निर्माण होतो. सिरोंच्यात ही सुविधा उपलब्ध झाल्यामुळे अशा अनेक कुटुंबांना मोठा आधार मिळू शकतो.
स्नेहदेवी राजे धर्मरोबाबा आत्राम बहुउद्देशीय संस्था, अहेरी यांच्या माध्यमातून आणि स्नेहधर्म चॅरिटेबल हॉस्पिटल अँड डायग्नोस्टिक सेंटर, सिरोंचा यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू होत असलेले हे केंद्र सिरोंचा तालुक्याच्या आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
“दुर्गम भागातील रुग्णाला उपचारासाठी दूर जावे लागू नये, हीच खरी आरोग्यसेवेची दिशा”
सिरोंच्यासारख्या दुर्गम भागात अत्याधुनिक आरोग्य सुविधा निर्माण होणे ही केवळ एका दवाखान्याची सुरुवात नसून, “आरोग्यसेवा गावाच्या दारापर्यंत पोहोचली पाहिजे” या विचाराला मिळालेली दिशा आहे. डायलिसिस सेंटरमुळे किडनीच्या रुग्णांना नियमित उपचाराची सुविधा जवळ उपलब्ध होऊन त्यांच्या जीवनात आशेचा नवा किरण निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सिरोंच्याच्या आरोग्यसेवेच्या वाटचालीतील आजचा दिवस निश्चितच एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
