सिरोंचा विशेष प्रतिनिधी दिनांक:01 नवंबर 2026
महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव यांचा सिरोंचा तालुक्याचा संभाव्य दौरा निश्चित करण्यात आला असून, या दौऱ्यात शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास, सिंचन, पर्यटन तसेच सीमावर्ती भागातील महत्त्वाच्या प्रकल्पांची पाहणी केली जाणार आहे. मुख्य सचिवांचा हा दौरा १ नोव्हेंबर २०२६ रोजी होणार असून, दौऱ्यादरम्यान विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली जाणार आहे. त्यानंतर २ नोव्हेंबर रोजी सिरोंचा येथून नागपूरकडे प्रस्थान करण्याचा संभाव्य कार्यक्रम आहे.
दौऱ्याच्या संभाव्य कार्यक्रमानुसार मुख्य सचिवांचे नागपूरवरून सिरोंचा येथे सकाळी ११.२० वाजता आगमन होणार आहे. त्यानंतर सकाळी ११.२५ ते ११.४५ या वेळेत सिरोंचा विश्रामगृह येथून प्रस्थान करून कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयास भेट देऊन पाहणी करण्यात येणार आहे. या भेटीत विद्यालयातील शैक्षणिक सुविधा, विद्यार्थिनींसाठी उपलब्ध सोयी-सुविधा, निवास व्यवस्था तसेच इतर बाबींचा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे.
यानंतर दुपारी १२.३० ते १.१५ या कालावधीत सिरोंचा विश्रामगृह येथे भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. भोजनानंतर फॉसिल पार्क, वडदन येथे दुपारी १.१५ ते २.३० या वेळेत भेट व पाहणी प्रस्तावित आहे. सिरोंचा तालुक्यातील पर्यटन व नैसर्गिक वारशाच्या दृष्टीने फॉसिल पार्क महत्त्वाचे असल्याने या भेटीकडेही लक्ष लागले आहे.
यानंतर मुख्य सचिवांचा ताफा मेडीगड्डा बॅरेजकडे रवाना होणार असून, दुपारी २.३० ते ३.३० या वेळेत बॅरेजची पाहणी प्रस्तावित आहे. गोदावरी नदीवरील मेडीगड्डा प्रकल्प हा महाराष्ट्र-तेलंगणा सीमावर्ती भागाशी संबंधित महत्त्वाचा विषय असल्याने या पाहणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. बॅरेजची सद्यस्थिती, तांत्रिक बाबी तसेच सीमावर्ती भागाशी संबंधित प्रश्नांचा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे.
त्यानंतर तुमनूर माल येथे दुपारी ३.३० ते ४.०० या वेळेत नवीन आरोग्य उपकेंद्र, ग्रामपंचायत अंगणवाडी केंद्रास भेट व तपासणी करण्यात येणार आहे. तसेच VB-GRAM-G अंतर्गत फळबागेची पाहणी केली जाणार आहे. ग्रामीण भागातील आरोग्य, महिला व बालकल्याण आणि कृषीविकासाच्या योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होत आहे, याचा आढावा या भेटीत घेतला जाण्याची शक्यता आहे.
यानंतर सायंकाळी ४ ते ५ या वेळेत प्राथमिक आरोग्य केंद्र, रंगय्यापल्ली येथे भेट व पाहणी प्रस्तावित आहे. आरोग्य केंद्रातील वैद्यकीय सुविधा, मनुष्यबळ, औषधसाठा, रुग्णसेवा आणि उपलब्ध पायाभूत सुविधांचा आढावा मुख्य सचिवांकडून घेतला जाण्याची शक्यता आहे.
सायंकाळी ५ वाजता सिरोंचा विश्रामगृह येथे मुक्काम प्रस्तावित आहे. त्यानंतर सायंकाळी ७ ते ८ या वेळेत सिरोंचा येथून काळेश्वरम येथील महादेव मंदिरात दर्शनासाठी जाण्याचा कार्यक्रम आहे. दर्शनानंतर रात्री ८ ते ८.३० या वेळेत सिरोंचा विश्रामगृह येथे चहा व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
रात्री ८.३० ते ९ या वेळेत मॉडेल स्कूल, सिरोंचा येथे भेट व पाहणी प्रस्तावित करण्यात आली आहे. शाळेतील शैक्षणिक वातावरण, विद्यार्थ्यांसाठीच्या सुविधा आणि आधुनिक शिक्षणाच्या दृष्टीने उपलब्ध पायाभूत सुविधांचा आढावा या वेळी घेतला जाण्याची शक्यता आहे.
दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात २ नोव्हेंबर २०२६ रोजी सिरोंचा येथून सकाळी १० वाजता नागपूरकडे प्रस्थान करण्याचा संभाव्य कार्यक्रम देण्यात आला आहे.
मुख्य सचिवांच्या या संभाव्य दौऱ्यामुळे सिरोंचा तालुक्यातील विविध शासकीय विभागांची यंत्रणा सज्ज झाली आहे. शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास, कृषी, पर्यटन आणि सिंचन क्षेत्रातील प्रत्यक्ष कामांचा वरिष्ठ पातळीवर आढावा होणार असल्याने या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सीमावर्ती सिरोंचा तालुक्यातील प्रलंबित प्रश्न आणि विकासकामांना या दौऱ्यामुळे गती मिळते का, याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.
टीप : वरील कार्यक्रम हा उपलब्ध माहितीनुसार संभाव्य दौरा कार्यक्रम असून वेळा व ठिकाणांमध्ये प्रशासनाकडून अंतिम क्षणी बदल होऊ शकतो.
