चामोर्शी विशेष प्रतिनिधी दिनांक :- 23 ऑक्टोबर 2026
शेतीपंपांना २४ तास नियमित आणि सुरळीत वीजपुरवठा करण्यात यावा, तसेच सिंचनाच्या पाण्याशी संबंधित शेतकऱ्यांच्या विविध समस्या तातडीने सोडवाव्यात, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मंगळवारी चामोर्शी येथे आक्रमक चक्काजाम आंदोलन करण्यात आले. पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती, चामोर्शीचे सभापती अतुलभाऊ गण्यारपवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात सुमारे ७० गावांतील महिला व पुरुष शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीमुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
सध्या शेतीसाठी आठ तासांवरून १२ तास वीजपुरवठा करण्यात येत असल्याचे सांगितले जात असले तरी, गावांचे आणि शेतीचे फिडर वेगळे करण्याचे काम सुरू असल्यामुळे दररोज पाच ते सहा तास वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे पिकांना आवश्यक त्या अंतिम टप्प्यात पाणी देणे शेतकऱ्यांना अडचणीचे ठरत आहे. आधीच पिकांच्या वाढीच्या निर्णायक अवस्थेत असताना वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आणि असंतोष निर्माण झाला आहे.
या प्रश्नाबाबत यापूर्वी जिल्हाधिकारी, महावितरणचे अभियंते, उपविभागीय अधिकारी, चामोर्शी, तहसीलदार चामोर्शी तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदने देण्यात आली होती. मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही शेतकऱ्यांची मागणी पूर्ण झाली नसल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे अतुलभाऊ गण्यारपवार यांनी सांगितले.
“दोन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत करा”
आंदोलनादरम्यान अतुलभाऊ गण्यारपवार यांनी शासन आणि प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला. “येत्या दोन दिवसांत शेतीपंपांना नियमित २४ तास वीजपुरवठा सुरू झाला नाही, तर उपविभागीय अधिकारी (महसूल), चामोर्शी यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा त्यांनी दिला.
गडचिरोली जिल्ह्यातील वीजप्रश्नावर बोलताना त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली. दिवंगत आर. आर. पाटील हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असताना जिल्ह्याला भारनियमनातून वगळण्यात आले होते, याची आठवण करून देत त्यांनी सध्याच्या परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
“राज्यातील इतर जिल्ह्यांतील एका तालुक्याला जेवढी वीज लागते, तेवढी वीज संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याला लागत नाही. मग गडचिरोली जिल्ह्यात सध्या भारनियमनाची परिस्थिती का निर्माण झाली?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सिंचनाच्या पाण्याच्या समस्यांवरही शेतकऱ्यांचा आक्रोश
केवळ वीजपुरवठाच नव्हे, तर सिंचनाच्या पाण्याशी संबंधित अनेक प्रश्नांवरही आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. गणपूर-येणापूर परिसरातील हळदीमाल येथील हलदीपुराणी लिफ्ट एरिगेशनचे पाणी शेतकऱ्यांना अपेक्षेप्रमाणे मिळत नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या.
चामोर्शी येथील चिचडोह बॅरेजमधून पाण्याचा विसर्ग बंद केला जात असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. तसेच कन्नमवार जलाशय, रेगडी येथील विभागाकडे शेतसारा भरूनही शेवटच्या टोकावरील अनेक गावांतील शेतकऱ्यांना सिंचनाचे पाणी उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी आंदोलनकर्त्यांनी मांडल्या.
सगणापूर, एकोडी, वेलतूर तुकूम, वाघोली, मोहोर्ली यासह इतर गावांतील शेतकऱ्यांना पाणी मिळत नसल्याने पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. शेतकऱ्यांकडून नियमितपणे शेतसारा व इतर कर आकारले जात असताना सिंचनाच्या पाण्याचा योग्य लाभ मिळत नसेल तर त्याची जबाबदारी कोणाची, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.
तहसीलदार व विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन
आंदोलनानंतर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार, चामोर्शी तसेच विद्युत विभागाच्या उपअभियंत्यांकडे सादर करण्यात आले. पिकांचे नुकसान टाळण्यासाठी वीजपुरवठ्याबाबत तातडीने निर्णय घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
शेती हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून पिकांच्या निर्णायक अवस्थेत वीज आणि सिंचनाचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पादनावर आणि उत्पन्नावर होतो. त्यामुळे प्रशासनाने केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
आंदोलनात पदाधिकारी व हजारो शेतकऱ्यांचा सहभाग
या चक्काजाम आंदोलनात अतुलभाऊ गण्यारपवार यांच्या नेतृत्वाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रेमानंद मल्लिक, नगरसेवक अमोल गण्यारपवार, सुरेश पाटील परसोडे, सुधाकर निखाडे, संचालक गोसावी सातपुते, विधानसभा अध्यक्ष राजू आत्राम, जिल्हा चिटणीस नरेंद्र जुवारे, करण गण्यारपवार, गुरुदास पाटील चौधरी, मधुकर चिंतलवार, तालुकाध्यक्ष विनोद भाऊ शेंगर, बाबुरावजी भोवरे, सुरेश नैताम, पुंजाराम वासेकर, मेषराज वैद्य, सुधाकर गद्दे, रमेश भसारकर, लवरू बोदेलकर, पत्रू सातपुते यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सुमारे ७० गावांतील हजारो महिला-पुरुष शेतकरी सहभागी झाले.
शेतकऱ्यांच्या मागण्यांवर शासन व प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन वीज आणि सिंचनाचा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
