गडचिरोली, जिल्हा प्रतिनिधी दिनांक 10 मार्च 2025
माओवादी प्रभावित गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांनी मोठी कारवाई करत नव्याने स्थापन झालेल्या कवंडे पोलीस ठाण्याच्या परिसरातील माओवादी स्मारके उद्ध्वस्त केली. माओवाद्यांनी मिडदापल्ली ते कवंडे मार्गावर ही स्मारके उभारली होती.
गडचिरोली जिल्हा हा माओवादी कारवायांसाठी अतिसंवेदनशील असून, अनेक दुर्गम भागातील आदिवासी समाज अद्याप मुख्य प्रवाहात आलेला नाही. त्यांच्या विकासाला चालना देण्यासाठी आणि माओवाद्यांच्या हालचाली रोखण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाकडून ठोस पावले उचलली जात आहेत. याच अनुषंगाने 9 मार्च 2025 रोजी भामरागड उपविभागातील मौजा कवंडे येथे नवीन पोलीस ठाण्याची स्थापना करण्यात आली.
माओवाद्यांच्या स्मारकांवर कारवाई

पोलीस ठाण्याच्या उभारणीदरम्यान, मिडदापल्ली ते कवंडे मार्गावर आणि पोलीस ठाण्याच्या जवळील परिसरात माओवाद्यांनी पूर्वीच स्मारके उभारली असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. परिसरात आपली दहशत कायम ठेवण्यासाठी आणि अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी माओवाद्यांनी ही स्मारके उभारली होती.
याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस दलाच्या विशेष अभियान पथकाने आणि बम शोध-नाश पथकाने (BDDS) परिसरात शोधमोहीम राबवली. तपासादरम्यान चार माओवादी स्मारके आढळून आली. सुरक्षा तपासणीनंतर विशेष अभियान पथकाच्या जवानांनी ती तात्काळ उद्ध्वस्त केली.
पोलीस दलाचा कडक इशारा
गडचिरोली पोलिसांनी मागील काही वर्षांपासून माओवाद्यांविरोधात आक्रमक मोहीम सुरू केली आहे. पोमके पेनगुंडा, नेलगुंडा आणि कवंडे या पोलीस ठाण्यांची स्थापना करून तसेच माओवादी स्मारके हटवून, पोलिसांनी परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण केला आहे.
या कारवाईचे नेतृत्व पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) श्री. एम. व्ही. सत्यसाई कार्तिक, पोलीस उप-अधीक्षक (अभियान) श्री. विशाल नागरगोेजे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड श्री. अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी सांगितले की, “माओवाद्यांविरोधातील अभियान अधिक तीव्र करण्यात आले असून, त्यांच्या प्रत्येक हालचालीवर पोलिसांचे लक्ष आहे. समाजात अशा बेकायदेशीर स्मारकांना कोणतेही स्थान नाही. नागरिकांनीही अशा कारवायांपासून दूर राहावे,” असे आवाहन त्यांनी केले.