अहेरी विदर्भ न्यूज 24 नेटवर्क दिनांक:-25/03/2025
अहेरी तालुक्यातील दामरंचा ग्रामपंचायतीत 2025 या आर्थिक वर्षासाठीच्या तेंदूपत्ता लिलाव प्रक्रियेत मोठा घोळ झाल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी अहेरीचे सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. त्यांनी सदर लिलाव प्रक्रिया रद्द करून दोषींवर फौजदारी कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
ग्रामसभेला बायपास, गुप्त लिलावाचा आरोप
तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, तेंदूपत्ता लिलावासाठी ग्रामपंचायतीने नियमानुसार ग्रामसभा बोलावून ग्रामस्थांचा विश्वास घेतला पाहिजे होता. मात्र, ग्रामकोष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विशिष्ट कंत्राटदाराला गुप्तपद्धतीने बोलावून लिलाव प्रक्रिया पार पाडली. याबाबत कोणतीही माहिती ग्रामस्थांना देण्यात आली नाही.
नियमांचे उल्लंघन – मजुरांचे आर्थिक नुकसान
तेंदूपत्ता लिलावासाठी स्थानिक वृत्तपत्रात जाहीरनामा प्रसिद्ध करणे आणि ग्रामपंचायत कार्यालयासमोर नोटीस लावणे आवश्यक होते. मात्र, या प्रक्रियेचे सर्रास उल्लंघन करण्यात आले. परिणामी, गुप्त लिलावामुळे तेंदूपड्याला कमी दर मिळाल्याने तेंदू मजुरांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
प्रशासकीय दुर्लक्षावर रोष
या प्रकरणी ग्रामस्थांनी वेळोवेळी प्रशासकीय स्तरावर तक्रारी केल्या, मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. स्थानिक ग्रामकोष समिती व पेसा समितीने परस्पर आर्थिक हितसंबंध साधण्यासाठी लिलाव प्रक्रिया नियमबाह्य पद्धतीने पार पाडल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तत्काळ लिलाव रद्द करण्याची मागणी
या पार्श्वभूमीवर, जनकल्याण समाजोन्नती अन्याय, भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी अहेरी यांच्याकडे तेंदूपत्ता लिलाव प्रक्रिया तात्काळ रद्द करून दोषींवर फौजदारी कार्यवाही करण्याची मागणी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे