गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी दिनांक:-03/04/2025
क्षमतेपेक्षा अधिकची रेती वाहतूक करणारे अवजड वाहन अहेरी तालुक्यातील मौसम गावाजवळ उलटल्याची घटना बुधवारी, (दि.2) सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या अपघातामुळे शासकीय परवानाच्या नावावर संबंधित रेती घाट मालकांकडून क्षमतेपेक्षा अधिकची रेती वाहतूकीतील झोल प्रकर्षाने पुढे आला आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनासह परिवहन विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देत नियम मोडणा-यांवर कठोर कारवाईची नितांत गरज व्यक्त होत आहे.
जिल्ह्याचा शेवटचा टोक असलेल्या सिरोंचा तालुक्यात रेती तस्करी जोमात सुरु असतांनाच शासन परवानगीनुसार होणारी रेती वाहतूकीतही झोल सुरु आहे. रेती घाटावर वाहतूक होणा-या रेतीची मोजमाप करण्यासाठी स्थानिक प्रशासनाद्वारे धर्मकाट्याची सुविधा उपलब्ध करुन देण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने रेती घाटातून अवजड वाहनांद्वारे रेतीची कोणतीही मोजमाप न करता क्षमतेपेक्षा अधिकची रेती वाहतूक करुन शासनाला लाखोंचा चूना लावल्या जात आहे. तसेच क्षमतेपेक्षा अधिकची रेती वाहतूक होत असल्याने अपघातासही आमंत्रण दिल्या जात आहे. शासकीय नियमानुसार रेती घाटाचे लिलाव झाले असले तरी घाटातून रेतीचे होणारे उत्खनन व वाहतूकीबाबत स्थानिक प्रशासनाद्वारे कमालीचे दुर्लक्ष केले जात असल्योन संबंधित घाट मालकाद्वारे मोठ-मोठ्या अवजड वाहनांद्वारे क्षमतेपेक्षा अधिकची रेती वाहतूक करुन शासनाला लाखोंचा चूना लावित आहे. रेती घाटावर धर्मकाटा नसल्याने रेती घाट मालकांची ही मनमर्जी सर्रास सुरु असल्याचे दिसून येत आहे. याच अंतर्गत क्षमतेपेक्षा अधिकच्या रेतीची वाहतूक करणारे अवजड ट्रक मार्गक्रमण करीत असताना वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने आलापल्लीलगत असलेल्या मौसम गावाजवळ भर रस्त्यातच उलटल्या गेले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ओव्हरलोड रेती वाहतूकीमुळे असेच अपघात होऊन जीवतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शासकीय परवान्यावर क्षमतेपेक्षा अधिकची रेती वाहतूक करणा-या रेती घाट मालकांवर चाप बसविण्यासाठी संबंधित प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे.
सिरोंचा, अहेरी तालुक्यासह तेलंगणा राज्यातून दररोज शेकडो ओव्हरलोड वाहने मार्गक्रमण करीत आहेत. या ओव्हरलोड वाहनांमुळे रस्त्यांची दैनावस्था होत आहे. सर्रास या अवजड वाहनांची रेलचेल सुरु असतांना याकडे परिवहन विभागाच्या अधिका-यांनी कमालीची डोळेझाक केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यामुळे रस्ता खराब होण्यासह अपघातालाही आमंत्रण दिल्या जात आहे. यासाठी संबंधित विभाग सर्वस्वी जबाबदार आहे. जिल्हाधिका-यांनी याकडे गांभीर्याने घेत परिवहन विभागाच्या अधिका-यांना धारेवर धरित कार्यवाही करण्याची निर्देश द्यावेत.
संतोष ताटीकोंडावार, सामाजिक कार्यकर्ते