सिरोंचा तालुका प्रतिनिधी दिनांक 7 एप्रिल 2025 –
स्थानिक पुरातन विठ्ठलेश्वर मंदिर परिसरात रामनवमीच्या दिवशी मंदिर ट्रस्टच्यावतीने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले. सकाळी प्रभू श्रीराम व सीतामाई यांच्या कल्याणम विधीचे आयोजन भक्तिभावात पार पडले. सिताराम कल्याणम सिरोंचा येथील प्रसिद्ध व्यापारी गोपाल करवा यांच्या धामपत्यांकडून पार पडला कल्याणमच्या निमित्ताने मंदिर परिसर भक्तिरसात न्हालं होतं.
सीताराम कल्याणम झाल्यानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसाद दिला गेला. हजारोंच्या संख्येने श्रद्धाळू भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.
सायंकाळी मंदिर ट्रस्ट आणि विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गा वाहिनी, तसेच वीर मराठा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दोन श्रीराम सेना, व शिव जयंती उत्सव समिती यांच्या मार्फत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेची सुरुवात विठ्ठलेश्वर मंदिरातून करण्यात आली. प्रभू श्रीरामाच्या पालखीची मिरवणूक, ढोल-ताशांच्या गजरात, भगव्या पताकांनी सजवलेल्या रथासह पारंपरिक पद्धतीने निघाली.
या शोभायात्रेचे विशेष आकर्षण ठरले ते दुर्गा वाहिनीच्या युवतींचे लाठी-काठीचे प्रदर्शन. त्यांनी दंडकला, लाठीचाल, आणि स्वसंरक्षणाचे प्रकार सादर करत उपस्थितांना स्त्रीशक्तीचे प्रेरणादायी दर्शन घडवले. आजच्या काळातील मुलींनी आत्मरक्षणासाठी सक्षम होणे किती महत्त्वाचे आहे, याचा संदेश त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दिला.
या संपूर्ण उत्सवात सिरोंचा नगरवासीयांचा मोठा प्रतिसाद लाभला. शहरात संपूर्ण दिवस धार्मिक उत्साह, संस्कृतीचा अभिमान आणि सामाजिक एकतेचा सुगंध दरवळत होता.
या यशस्वी कार्यक्रमासाठी मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गा वाहिनी आणि वीर मराठा समितीचे कार्यकर्ते यांनी मोलाचे योगदान दिले. कार्यक्रमात सिरोंचा नगरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. संपूर्ण परिसरात धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक ऐक्याचे सुंदर दर्शन घडले.
सिरोंचा तालुक्यातील अनेक गावांत देखील रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आरडा, अंकीसा, आसरअल्ली, रेगुंठा, टेकडा या गावांमध्ये पारंपरिक पद्धतीने पूजन, भजन-कीर्तन, शोभायात्रा, महाप्रसाद तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. गावकऱ्यांनी सामूहिक सहभागातून या सणाचे महत्त्व अधोरेखित केले.