गडचिरोली दिनांक:-08 एप्रिल 2025
गडचिरोली जिल्ह्यात नुकतीच एक सकारात्मक आणि आश्वासक घडामोड घडली. राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागाच्या आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 450 आंतरजातीय विवाहीत जोडप्यांना प्रत्येकी ५०,००० रुपये या प्रमाणे एकूण २ कोटी २५ लाख रुपयांचे अर्थसहाय देण्यात आले आहे.
या योजनेचा मूळ उद्देश समाजात समता, बंधुता आणि सामाजिक सलोखा निर्माण करणे हा आहे. जातीच्या चौकटी तोडून प्रेम आणि सहजीवन स्वीकारणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहन देणे, ही सामाजिक प्रगतीची नांदी ठरू शकते.
विशेष म्हणजे, 2021-22 पासून प्रलंबित लाभार्थ्यांनाही यावर्षी निधी वितरित करण्यात आला. हे शासनाच्या कामकाजातील गांभीर्य आणि जबाबदारीचे उदाहरण म्हणता येईल.
जिल्हा परिषद गडचिरोलीचे समाजकल्याण अधिकारी चेतन हिवंज यांनी स्पष्ट केलं की, ही योजना फक्त आर्थिक मदतीपुरती मर्यादित नसून, समाजात असणाऱ्या खोलवर रुजलेल्या जातभेदाच्या भिंती पुसण्यासाठी एक प्रभावी पाऊल आहे.
गडचिरोलीसारख्या सामाजिकदृष्ट्या संवेदनशील भागात ही योजना प्रभावीपणे राबवली गेली, याचे विशेष कौतुक व्हायला हवे. यामुळे आंतरजातीय विवाह करणाऱ्यांचे मनोबल निश्चितच वाढेल आणि इतर जोडप्यांसाठीही प्रेरणादायी ठरेल.
पण केवळ इतक्यावर समाधान न मानता, ही योजना इतर भागांमध्येही तितक्याच प्रभावीपणे पोहोचवणे ही पुढील जबाबदारी आहे. तसेच, लाभार्थ्यांपर्यंत अचूक व पारदर्शकपणे निधी पोहोचतो आहे की नाही, यावर सातत्याने देखरेख ठेवणे गरजेचे आहे.
या संपूर्ण उपक्रमातून एक गोष्ट निश्चितपणे ठळकपणे पुढे येते – समाज बदलतो आहे, विचार बदलत आहेत, आणि शासनदेखील त्या बदलात भागीदार होऊ पाहत आहे.
विशेष संपादकीय
संदीप राचर्लावार
मुख्य संपादक विदर्भ न्यूज 24 नेटवर्क
9421729671