विशेष संपादकीय दिनांक:-10/04/2025
राज्यातील पत्रकारांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे राज्य शासनाने सकारात्मक पाऊल उचलले आहे, ही गोष्ट निश्चितच स्वागतार्ह आहे. विशेषतः आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेत सुधारणा करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले निर्देश ही एक महत्त्वाची घडामोड मानली पाहिजे.
या योजनेतील अनुभवाची अट ३० वर्षांवरून २५ वर्षे आणि वयोमर्यादा ६० वरून ५८ करण्याच्या मागणीला सरकारने सकारात्मक प्रतिसाद देत विविध पत्रकार संघटनांच्या सूचना मागविल्या आहेत. पत्रकारिता क्षेत्रात दीर्घकालीन सेवा देणाऱ्या व्यक्तींसाठी ही योजना अधिक सुलभ आणि सर्वसमावेशक करणे आवश्यक आहे.
तसेच, कांदिवली गृहनिर्माण योजना, शंकरराव चव्हाण कल्याण निधीतील मदतवाढ, एसटी बसमध्ये सवलत, आणि मंत्रालय प्रवेशासाठीचे तंत्रज्ञान या सगळ्या गोष्टी पत्रकारांच्या दैनंदिन जीवनात दिलासा देणाऱ्या आहेत.
परंतु केवळ घोषणा करून भागणार नाही. या निर्णयांची अंमलबजावणी वेळेत आणि पारदर्शकपणे होणे तितकेच महत्त्वाचे आहे. पत्रकार ही समाजाचा आरसा असते, आणि तिच्या सुरक्षितता, आरोग्य व सन्मानासाठी शासनाने उचललेली प्रत्येक पावले लोकशाहीसाठी बळकटी देणारी ठरतात.
या पार्श्वभूमीवर, पत्रकार संघटनांनीही आपापसातील एकवाक्यता टिकवून ठोस सूचना सरकारपर्यंत पोहोचवाव्यात, जेणेकरून सर्वसमावेशक आणि प्रभावी निर्णय घेता येतील. पत्रकारांच्या सन्मानासाठी सरकार आणि पत्रकार दोघांनीही आपापली जबाबदारी समजून सकारात्मक वाटचाल करणे, हीच सध्या काळाची गरज आहे.
विशेष संपादकीय संदीप राचर्लावार मुख्य संपादक विदर्भ न्यूज 24 नेटवर्क 9421729671