संपादकीय दिनांक:- 15 एप्रिल 2025
राज्याच्या सार्वजनिक परिवहन व्यवस्थेचा कणा असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रताप सरदेसाई यांची निवड ही एक स्वागतार्ह घटना आहे. सामाजिक कार्याचा प्रदीर्घ अनुभव, लोकांशी असलेली थेट नाळ आणि प्रशासनाशी असलेले सुसंवाद यामुळे त्यांच्या नेतृत्वाकडून अनेक अपेक्षा आहेत. मात्र हे अध्यक्षपद केवळ प्रतिष्ठेचे नसून ते जबाबदारीचे आहे, हे लक्षात ठेवावे लागेल.
आज गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, मूलचेरा यांसारख्या दुर्गम तालुक्यांमध्ये मानव विकास मिशन अंतर्गत शालेय विद्यार्थिनींसाठी नेमलेल्या बसेसचा सर्रास अपवापर केला जात आहे. ही योजना ग्रामीण मुलींच्या सुरक्षित आणि मोफत प्रवासासाठी २०१२ साली सुरू करण्यात आली होती. मात्र, आता या निळ्या बसेसवर ‘पांढरे बोर्ड’ लावून त्यांचा व्यावसायिक आणि जलद प्रवासासाठी वापर केला जात आहे.
या प्रकारामुळे शेकडो विद्यार्थी शाळेपासून दूर राहतात. बस अभावी शाळा चुकतात, परीक्षा चुकतात, आणि शिक्षणाची साखळी तुटते. एकीकडे शासन ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’चा नारा देत आहे, तर दुसरीकडे बेटींना शाळेपर्यंत पोचवणाऱ्या बसचाच गैरवापर केला जात आहे – हे तितकेच विरोधाभासी आणि दु:खद चित्र आहे.
ही बाब केवळ धोरणात्मक चूक नाही, तर ग्रामिण समाजाच्या शिक्षण हक्कावर होणारा थेट आघात आहे. अशा वेळी एस.टी. महामंडळाच्या अध्यक्षपदावर विराजमान झालेल्या प्रताप सरदेसाई यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.
ते केवळ तात्पुरत्या बस फेऱ्या वाढवण्याचे निर्णय घेण्यापुरते थांबू नयेत, तर योजनेचा मूळ उद्देश कायम राहील याची खातरजमा व्हावी, असे जनतेला वाटते. मानव विकास मिशन अंतर्गत नेमलेल्या बसेसचा उद्देश मोडीत काढणारे अधिकारी, आगार व्यवस्थापक आणि स्थानिक पातळीवरचे हितसंबंध – या सगळ्यांवर कारवाई होणे आवश्यक आहे.
जर एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी या अन्यायाविरुद्ध ठोस भूमिका घेतली, तर त्यांचा कार्यकाळ फक्त व्यवस्थापनापुरता मर्यादित न राहता सामाजिक परिवर्तनासाठी आठवला जाईल.
अध्यक्षपद हे केवळ सत्ता नव्हे, तर ते संधी आहे – अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची, ग्रामीण शिक्षणाच्या संरचनेत सुधारणा करण्याची, आणि खऱ्या अर्थाने ‘लोकसेवा’ साध्य करण्याची.
गडचिरोली जिल्ह्यातील हे प्रश्न केवळ दूरदृष्टी, इच्छाशक्ती आणि प्रामाणिक कृतीनेच सुटू शकतात.
आता तरी एस.टी. महामंडळाच्या अध्यक्षांनी या गंभीर प्रश्नांकडे लक्ष देणार का? हा प्रश्न अजूनही उभा आहे. आणि आता त्याचे उत्तर कृतीतून मिळेल, अशी अपेक्षा सर्वसामान्य जनता बाळगून आहे.
विशेष संपादकीय संदीप राचर्लावार मुख्य संपादक विदर्भ न्यूज २४ नेटवर्क 9421729671