अहेरी, (प्रतिनिधी) 21 एप्रिल 2025
भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम नेलगुंडा गावातून आलेली हैती मंगरु पुंगाटी ही गर्भवती महिला तिच्या पहिल्या बाळंतपणासाठी अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती. तब्बल चार महिने सुरू असलेल्या उपचार व देखभालीनंतर, अखेर तिला व तिच्या बाळाला घरी पाठवण्यात आले. रुग्णालयातील संपूर्ण कर्मचारीवृंद या क्षणी भावूक झाला आणि मायाळूपणाने केलेल्या सेवा-सुश्रुषेच्या आठवणींनी डोळे पाणावले.
हैती डिसेंबर महिन्यात प्रथम दाखल झाली होती, तेव्हा तिच्या शरीरात गंभीर रक्तक्षय होता. पुढील तपासणीत थॅलेसेमिया हा रक्तविकार असल्याचे निदान झाले. तिच्या प्रकृतीसाठी वारंवार रक्ताची आवश्यकता भासत होती. परिस्थिती बिकट असूनही हैती व तिचा पती फक्त काही दिवस पुरतील इतकेच कपडे व थोडेसे पैसे घेऊन अहेरीला आले होते.
या चार महिन्यांत रुग्णालयातील परिचारिका, कर्मचारी व डॉक्टरांनी तिला आपलीच बहीण, मुलगी समजून तिची सेवा केली. पोषक आहार, कपड्यांची गरज, औषधोपचार – या सगळ्यांची व्यवस्था रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी केली. “बाळंतपण माहेरी करायचे असते, आणि आमच्यासाठी अहेरीचे रुग्णालयच माहेर झाले,” असे भावुक उद्गार हैतीच्या तोंडून निघाले.मायाळूपणाची उदाहरण दिसून आले
चार महिन्यांच्या काळात हैतीला *१४ वेळा रक्त देण्याची गरज पडली. या प्रत्येक वेळेस विकास तोडसाम आणि कृणाल सल्लम या सामाजिक कार्यकर्त्यांनी रक्ताची व्यवस्था केली. कोणतीही अडचण न होता वेळेवर रक्त मिळवून देणे, हे त्यांचे कार्य कौतुकास्पद ठरले.
या संपूर्ण प्रक्रियेत डॉ. कन्ना मडावी, डॉ. राहुल महल्ले, डॉ. निरिक्षा मॅडम व बालरोगतज्ज्ञ डॉ. हकीम यांनी अतिशय निष्ठेने आणि काळजीपूर्वक उपचार केले. बाळ जन्मल्यानंतरही वजन कमी असल्याने उपचार सुरू ठेवावे लागले.डॉक्टरांची समर्पित भूमिका या माध्यमातून दिसून आले
हैती आणि तिच्या बाळाची रवानगी करताना रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे डोळे पाणावले. कुठे तरी एका अनोळखी स्त्रीच्या जीवनाचा हिस्सा बनल्याचे समाधान सर्वांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. “हा क्षण आम्हा सर्वांसाठी विशेष आहे – एका बाळंतीणीच्या आयुष्यात आपण माहेरासारखी भूमिका निभावली,” असे मत एका परिचारिकेने व्यक्त केले.रुग्णालयाचा भावूक निरोप या बाळंत माताला देण्यात आले