गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी दिनांक 22 एप्रिल 2025 गडचिरोली येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. विनायक आर. जोशी यांनी सरकारी कर्तव्यात अडथळा निर्माण करणाऱ्या आणि एस.टी. चालकावर चाकूने हल्ला करणाऱ्या आरोपीस 2 वर्षे सश्रम कारावास व 20,000 रुपयांच्या द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली. तसेच सदर दंडाची रक्कम ही जखमी फिर्यादीस नुकसानभरपाई स्वरूपात देण्याचे आदेशही दिले.
घटनेचा तपशील असा आहे की, फिर्यादी प्रविण विश्वनाथ तलांडे (वय 39), व्यवसायाने एस.टी. चालक, रा. गडचिरोली, हे दिनांक 9 मार्च 2019 रोजी एस.टी. बस क्रमांक MH-06-C-8843 घेऊन वाहक रविंद्र पुज्जलवार यांच्यासोबत गडचिरोलीहून गोंडपिपरीकडे जात होते. प्रवासादरम्यान, गणपूर येथील लोकमान्य टिळक विद्यालयासमोर आरोपी सुनिल जनार्धन कोहपरे (रा. गणपूर, ता. चामोर्शी) याने आपली मोटारसायकल मुद्दाम रस्त्याच्या मध्यभागी उभी ठेवली होती.
ज्या वेळी चालकाने वाहन बाजूला करावं म्हणून गाडीला हात लावला, तेव्हा आरोपीने एस.टी. चालकाच्या कॉलरला धरून शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. याच वेळी आरोपीने खिशातून चाकू काढून फिर्यादीवर वार करण्याचा प्रयत्न केला. प्रतिकार करत असताना चाकू फिर्यादीच्या उजव्या मांडीवर लागला आणि ते गंभीर जखमी झाले.
यावेळी उपस्थित वाहक व प्रवाशांनी मिळून जखमी चालकास प्रथम गणपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि नंतर चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
पोलीस तपास व न्यायालयीन प्रक्रिया:
फिर्यादीच्या तक्रारीवरून चामोर्शी पोलीस ठाण्यात 10 मार्च 2019 रोजी IPC कलम 353, 332, 324, 341, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीस 29 मार्च 2019 रोजी अटक करण्यात आली. तपास पूर्ण करून आरोपीविरुद्ध सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
सेशन केस क्र. 115/2019 अंतर्गत न्यायालयात खटला चालवण्यात आला. फिर्यादी, पंच व साक्षीदारांचे जबाब, तसेच सरकारी पक्षाच्या प्रभावी युक्तिवादाच्या आधारे आरोपीस दोषी ठरवण्यात आले.
शिक्षेचा निकाल:
22 एप्रिल 2025 रोजी निकाल देताना मा. न्यायाधीशांनी आरोपीस भारतीय दंड संहितेच्या कलम 341, 324, 504, 506, 332 व 353 अंतर्गत दोषी ठरवत दोन वर्षांची सश्रम कारावासाची आणि 20,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास 6 महिन्यांची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागेल. तसेच हा दंड जखमी फिर्यादीस देण्याचे आदेशही दिले.
सरकारी पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील श्री. सचिन यु. कुंभारे यांनी कामकाज पाहिले. गुन्ह्याचा तपास परि.पोउपनि. दिनेशकुमार लिल्हारे यांनी केला. न्यायालयीन प्रक्रिया सुचारू रित्या पार पडावी यासाठी पोनि. चंद्रकांत वाभळे, श्रेणीपोउपनि. शंकर चौधरी आणि सफौ सागर मुल्लेवार यांनी सहकार्य केले.