नागपूर विशेष प्रतिनिधी दिनांक:-04 मे 2025
वर्धा जिल्ह्यातील एग्रो थिएटरने आणखी एक प्रतिभावान कलाकार मराठी चित्रपटसृष्टीला दिला आहे. नागपूरच्या आदित्य धनराज यांची ‘बंजारा’ या आगामी मराठी चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी निवड झाली आहे. हा चित्रपट येत्या १६ मे २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
सन २०१७ मध्ये अभिनेता होण्याचे स्वप्न उराशी बाळगून आदित्यने वर्ध्यातील हरीश इथापे संचालित एग्रो थिएटरमध्ये प्रवेश घेतला. त्यांनी येथे नैसर्गिक अभिनयशैलीचे प्रशिक्षण घेतले आणि लखनऊ येथील ‘भारतेंदु नाट्य अकादमी’त निवड झाल्यानंतर तीन वर्षे अभिनयाचा सखोल अभ्यास केला.
चित्रपटसृष्टीत कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही आदित्यने आपल्या जिद्द आणि कष्टाच्या जोरावर मुंबईत प्रवेश केला. त्याच्या अभिनय क्षमतेची दखल घेत, निर्मात्यांनी त्याला ‘बंजारा’ या चित्रपटात मुख्य भूमिका दिली. या चित्रपटात मराठी रंगभूमीतील दिग्गज कलाकार भरत जाधव, सुनील बर्वे यांच्यासोबत आदित्य दिसणार आहे.
एग्रो थिएटरचे संचालक हरीश इथापे यांनी यापूर्वीही अनेक नवोदित कलाकार घडवले आहेत. आदित्यचा यशस्वी प्रवास हे या संस्थेच्या कार्याची पोचपावती आहे. त्याला मिळालेल्या यशाबद्दल संपूर्ण एग्रो थिएटर परिवार, संजय इंगळे तिगावकर, चैतन्य आठले, रसिका मुळे आदींनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
कलाक्षेत्रातील संघर्ष करणाऱ्या नवोदितांसाठी आदित्यचा प्रवास एक प्रेरणादायी मार्गदर्शक ठरेल, यात शंका नाही.