गडचिरोली | प्रतिनिधी दिनांक:-05 मे 2025. राज्यातील युवकांच्या संघर्षशील चळवळीचा आवाज असलेल्या गडचिरोली जिल्ह्याला मोठा सन्मान मिळाला आहे. ऑल इंडिया युथ फेडरेशन (AIYF) च्या 17व्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनात कॉ. सचिन मोतकुरवार यांची राज्य उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. अमरावती येथे नुकतेच पार पडलेले हे अधिवेशन राज्यभरातील युवक आंदोलकांसाठी प्रेरणादायी ठरले.
कॉ. सचिन मोतकुरवार हे गडचिरोली जिल्ह्यातील खऱ्या अर्थाने जनतेच्या प्रश्नांवर लढणारे कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध आहेत. ते गेली अनेक वर्षे आदिवासी, दलित, वंचित, युवक आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने संघर्ष करत आहेत. त्यांनी AISF (All India Students Federation), AIKS (All India Kisan Sabha), आणि CPI (Communist Party of India) या संघटनांच्या माध्यमातून विविध आंदोलने उभारून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
या अधिवेशनात राज्य कार्यकारिणीची नवी निवड करण्यात आली. यामध्ये पुढीलप्रमाणे पदाधिकाऱ्यांची निवड झाली:
राज्याध्यक्ष: कॉ. आरती रेडेकर (कोल्हापूर) सचिव: कॉ. सागर दुर्योधन (अमरावती)उपाध्यक्ष: कॉ. विकास गायकवाड (छत्रपती संभाजीनगर), कॉ. सचिन मोतकुरवार (गडचिरोली) सह सचिव: नयन गायकवाड (अकोला)कोषाध्यक्ष: कॉ. इकबाल हुसैन खान (ठाणे)
कॉ. मोतकुरवार यांची ही निवड गडचिरोली जिल्ह्यातील युवक चळवळीला मिळालेली राज्यस्तरीय मान्यता मानली जात आहे. शिक्षणातील असमानता, बेरोजगारी, सामाजिक अन्याय, जातीभेद व पिढ्यानपिढ्यांच्या शोषणाविरोधात त्यांनी नेहमीच आवाज उठवला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली जिल्ह्यात विद्यार्थ्यांचे व आदिवासींचे अनेक प्रश्न शासन दरबारी नेले गेले आहेत.
AIYF ही देशातील डावे विचारसरणीची ऐतिहासिक युवक संघटना असून, तिच्या माध्यमातून समाजवादी विचार, धर्मनिरपेक्षता, आणि सामाजिक न्याय यांचा प्रचार व प्रसार केला जातो. राज्य उपाध्यक्षपदी अशा लढवय्या कार्यकर्त्याची निवड ही संघटनेच्या आगामी आंदोलनांना अधिक धार देणारी ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
“ही निवड माझ्यासाठी सन्मानासोबतच जबाबदारीची जाणीव करून देणारी आहे. महाराष्ट्रातील युवकांना न्याय, शिक्षण, आणि रोजगार यासाठी आम्ही आंदोलन अधिक तीव्र करू,” असे वक्तव्य कॉ. मोतकुरवार यांनी निवडीनंतर केले.
गडचिरोली जिल्ह्यातून विविध क्षेत्रांत युवक घवघवीत यश मिळवत आहेत. मात्र, सामाजिक चळवळीतील अशा निवडी जिल्ह्यातील युवकांच्या संघर्षशील कार्याला मिळालेली पावती म्हणून पाहिली जात आहे.