सिरोंचा (प्रतिनिधी) दिनांक:-08 मे 2025
सिरोंच्याच्या हद्दीतून वाहणाऱ्या गोदावरी प्राणहिता नदीवर उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353C वरील पुलाचे दुरुस्ती काम सध्या नागरिकांच्या जिवावर उठले आहे. निकृष्ट दर्जाचे साहित्य, कामातली कुचराई आणि वेळेवर न पूर्ण होणाऱ्या प्रक्रियेमुळे जनतेचा संयम संपला आणि अखेर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरून “चक्का जाम” आंदोलन छेडण्यात आले.
काम नाही, सुरक्षा नाही – मग जनता किती काळ सहन करणार?
गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरु असलेली दुरुस्ती ही केवळ नावापुरती वाटतेय, कारण पूल अजूनही धोकादायक स्थितीत आहे. भेगांची वाढती संख्या, कोणतीही सुरक्षा यंत्रणा नाही आणि अपघाताची वाढती शक्यता – या सगळ्याचा फटका रोजच्या प्रवाशांना बसतोय. या सर्व पार्श्वभूमीवर जनतेचा संताप उफाळून आला आणि काँग्रेसने आक्रमक भुमिका घेतली.
आंदोलनाचा जोर – घोषणांनी दुमदुमला पूल परिसर
तालुका काँग्रेस अध्यक्ष सतीश जवाजी यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी ११ वाजता आंदोलनाला सुरुवात झाली. “निकृष्ट काम बंद करा”, “प्रशासन जागे हो”, “दर्जा नाही, तर काम नाही” अशा घोषणांनी प्राणहिता पुल परिसर दुमदुमून गेला. नागरिक, व्यापारी, युवक आणि काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. आंदोलनामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली; मात्र सर्वसामान्य नागरिकांनी देखील या आंदोलनास पाठिंबा दर्शवला.
प्रशासनाची धावपळ – अखेर लेखी आश्वासन
चक्का जामच्या तीव्रतेमुळे प्रशासन हलकल्लोळ झाले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (NHAI) अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. काँग्रेस नेत्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर १५ मे २०२५ पर्यंत उच्च दर्जाचे काम पूर्ण करण्याचे आणि निकृष्ट साहित्य वापरणार नसल्याचे लिखित आश्वासन प्रशासनाने दिले.
जनता-प्रतिनिधी एकत्र – पुढील कामात लोकप्रतिनिधींचा सहभाग
NHAI कडून पुढील कामात स्थानिक जनप्रतिनिधींचा सहभाग सुनिश्चित करण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यामुळे काँग्रेसने सध्या आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अध्यक्ष सतीश जवाजी यांनी इशारा दिला की, “वेळेत आणि दर्जाने काम झाले नाही, तर यापेक्षाही तीव्र आंदोलन केले जाईल.
”लोकशक्तीचा विजय की प्रशासनाची चूक सुधारण्याची संधी?
हे आंदोलन प्रशासनाला जागे करण्यासाठी एक परिणामकारक इशारा ठरला आहे. जर वेळेत काम पूर्ण झाले, तर जनतेला मोठा दिलासा मिळेल. अन्यथा, हा जनतेचा उद्रेक आगामी काळात अधिक तीव्र रूप धारण करू शकतो.
उपस्थित मान्यवर – जनतेच्या मागणीला बळ
या आंदोलनात तालुक्यातील ज्येष्ठ नेते कृषी.ऊ.बा. संचालक अकुला मालिकार्जून, नागराज इंगिली, माजी उपसरपंच रवीभाऊ सल्लमवार, नगरसेवक राजेश बंडेला, नागेश दुग्याला, शंकर मंचार्ला, मारुती गाणंपुरपू, सारय्या सोनारी, संपत अंबाला, सलाम अब्दुल, प्रणीत मारगोनी आदी पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला.