सिरोंचा (प्रतिनिधी): दिनांक आठ मे 2025 सिरोंचा शहरात आर्य वैश्य समाजाच्या कुलदैवत आणि आराध्य देवी माता कन्यका परमेश्वरी, अर्थात वासवी मातेचा जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावात, परंपरेनुसार आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने संपूर्ण शहरात श्रद्धा, निष्ठा आणि धार्मिक उर्जेने भारलेलं वातावरण अनुभवायला मिळालं.
उत्सवाची सुरुवात प्राणहिता नदीच्या घाटावर मंगल स्थान या विशेष विधीने झाली. मंदिरातून देवीची मूर्ती ढोल-ताशांच्या गजरात, भगव्या ध्वजांच्या लहरात, जयघोषांसह नदीकाठी नेण्यात आली. पारंपरिक वेषभूषेत सहभागी झालेल्या महिला, पुरुष आणि युवक-युवतींनी रॅलीस रंगत आणली.
घाटावर पूजन, आरती, आणि नंतर देवीची पुन्हा कन्यका मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली. यानंतर अभिषेक, कुंकू-अर्चना, पारायण, कन्यका माता चालीसा पठण आणि महाआरतीसह विविध धार्मिक विधी पार पडले. शेकडो भाविकांनी या प्रत्येक विधीत भक्तिभावाने सहभाग नोंदवला.
यावेळी कन्यका मंदिरात सादर करण्यात आलेलं कू. वासवी ताटीकोंडावार हिचं नृत्य हे या उत्सवाचं खास आकर्षण ठरलं. तिच्या नृत्यातून प्रकटलेली भक्ती आणि सादरीकरणातील नजाकत भाविकांच्या मनाला भावली. टाळ्यांच्या कडकडाटात तिच्या कलाविष्काराचे भरभरून कौतुक करण्यात आलं.
यानंतर उपस्थित सर्व भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. महाप्रसादाचा आस्वाद घेतले अनेक भाविकांनी समाधान व्यक्त केलं.
सायंकाळी शहरातून पारंपरिक पद्धतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली. “वासवी माता की जय” आणि “जय श्रीराम” च्या घोषणांनी संपूर्ण सिरोंचा दुमदुमून गेला. या शोभायात्रेत पुरुषांनी पांढरे शर्ट/कुर्ते, तर महिलांनी लाल रंगाच्या साड्या नेसून सहभाग नोंदवला, ज्यातून समाजाची एकता आणि सांस्कृतिक सौंदर्य अधोरेखित झालं. शहरातील चौकाचौकात झालेल्या स्वागतामुळे शोभायात्रेची शोभा अधिकच वाढली.
या दिवशी शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानदारांवरून सहभाग नोंदवत प्रतिष्ठाने बंद ठेवली. त्यामुळे संपूर्ण शहर भक्तिरसात न्हालं.
हा भव्य आणि भक्तिपूर्ण उत्सव आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष ओमप्रकाश ताटीकोंडावार यांच्या नेतृत्वात आणि समिती सदस्यांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडला. त्यांनी सर्व भाविकांचे, स्थानिक प्रशासनाचे आणि पोलिस दलाचे आभार मानले. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवून शोभायात्रा आणि रॅली सुरळीत पार पाडण्यास महत्त्वाचे सहकार्य केले.