नागपूर, 13 मे 2025 (विशेष प्रतिनिधी)
भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी तात्काळ हवामान इशारा जारी केला आहे. आज सायंकाळी १६:०० वाजता प्रसिद्ध करण्यात आलेल्या या इशाऱ्यानुसार, पुढील तीन तासांत काही भागांमध्ये विजांसह वादळी वाऱ्यांचा जोरदार तडाखा आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
नागपूर व वर्धा जिल्ह्यांमध्ये विशेष सावधगिरी आवश्यक या दोन जिल्ह्यांतील काही भागांत ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारे, विजांचा कडकडाट आणि हलक्या पावसाची शक्यता आहे. नागरिकांनी सुरक्षित स्थळी थांबावे आणि विजेपासून बचावासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
इतर जिल्ह्यांमध्येही वातावरण अस्थिर
चंद्रपूर, गोंदिया, अमरावती, भंडारा, गडचिरोली, अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यांतील काही ठिकाणी ३० ते ४० किमी प्रतितास वाऱ्यांसह विजांचा कडकडाट आणि पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या सूचना:
विजांच्या वेळी उघड्यावर किंवा झाडांखाली थांबू नये
शेतीकामे थांबवून यंत्रसामग्री संरक्षित ठिकाणी ठेवावी
वीज आणि मोबाइल उपकरणांचा वापर टाळावा
गरज असल्यास स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा
विदर्भात सध्या हवामानात अचानक बदल होत असून, नागरिकांनी हवामान विभागाच्या इशाऱ्याकडे गांभीर्याने पाहणे अत्यंत आवश्यक आहे. ही माहिती प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर (IMD) यांनी प्रसिद्ध केली आहे