सिरोंचा,(प्रतिनिधी)दिनांक:-12/05/2025 सिरोंचा तालुक्यातील मद्दीकुंटा येथील गोदावरी नदी पात्रातून अवैधरित्या रेतीची तस्करी सुरू असल्याची खात्रीलायक माहिती महसूल प्रशासनाला मिळताच, १० मे रोजी मध्यरात्री १ ते २ वाजेच्या दरम्यान महसूल विभागाने धडक कारवाई केली. या कारवाईत तब्बल १५ ट्रॅक्टर रेतीसह जप्त करण्यात आले असून, या प्रकारामुळे रेती तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
ही मोहीम प्रभारी तहसीलदार हमीद सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली, नायब तहसीलदार श्रीनिवास तोटावार यांच्या नेतृत्वात राबविण्यात आली. मद्दीकुंटा परिसरात गोदावरी नदीच्या पात्रातून रात्रीच्या अंधारात अवैधपणे रेतीची वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास येताच, महसूल विभागाने नियोजनपूर्वक छापा टाकला.
छाप्यादरम्यान गोदावरी नदी पात्रात १५ ट्रॅक्टर अवैधपणे रेती भरून वाहतूक करताना आढळून आले. यानंतर सर्व ट्रॅक्टर जप्त करून तहसील कार्यालय, सिरोंचा येथे जमा करण्यात आले आहेत.
या कारवाईत प्रशांत धात्रक, मंडळ अधिकारी प्रविण डोंगरे, मुरली इचकापे आणि तलाठी संजय सिडाम यांचा सक्रिय सहभाग होता. स्थानिक प्रशासनाने ही कारवाई यशस्वी करण्यासाठी नदीपात्रात प्रत्यक्ष उतरून कार्यवाही केली.
रेती तस्करीचा वाढता प्रश्न आणि महसूल विभागाची कारवाई सिरोंचा तालुक्यात गोदावरी नदीकाठावर अनेक ठिकाणी अवैधरित्या रेती उपसा व वाहतूक सुरू असल्याच्या तक्रारी वेळोवेळी स्थानिक नागरिकांनी केल्या आहेत. मात्र, यावर ठोस पावले उचलली जात नसल्याची टीका होत होती. यावेळेस महसूल विभागाने तात्काळ धाडसी पाऊल उचलून मोठ्या प्रमाणात रेती माफियांवर कारवाई केल्यामुळे स्थानिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू
जप्त केलेल्या सर्व १५ ट्रॅक्टरविरोधात महसूल विभाग कायदेशीर कारवाई करणार असून, संबंधितांवर दंडात्मक प्रक्रिया हाती घेतली जात आहे. तसेच, यापुढे अशा अवैध रेती तस्करीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित निरीक्षण व कारवाया करण्यात येणार असल्याचे तहसील कार्यालयाने स्पष्ट केले आहे.