गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी दिनांक:-15 मे 2025 जिल्ह्यातील ताडगाव पोलीस स्टेशन हद्दीतील कुडकेली जंगल परिसरात सुरू करण्यात आलेल्या बनावट देशी दारू कारखान्यावर गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 39.31 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व विशेष पथकाच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आली.
पोलिस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या आदेशानुसार आणि प्रभारी पोलीस अधीक्षक श्री. यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. दोन दिवसांपूर्वी उभारण्यात आलेल्या या कारखान्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कारवाई करण्यात आली.
14 मे रोजी रात्री उशिरा पोलिसांनी जंगल परिसरात सर्च ऑपरेशन राबवत परिसराचा घेराव केला. पोलिसांची चाहूल लागताच एक चारचाकी वाहन घटनास्थळावरून पलायन करू लागले. पाठलाग करत असताना हे वाहन 200 मीटर अंतरावर आढळून आले, मात्र चालक अंधाराचा व जंगलाचा फायदा घेऊन पसार झाला. वाहनात मोठ्या प्रमाणावर देशी दारू आढळून आली.
त्यानंतर सकाळी 15 मे रोजी पंचासमक्ष छापा टाकण्यात आला. यावेळी स्पिरीट, तयार दारू, बाटल्या, वाहने, जनरेटर, सिलींग मशिन्स, लेबल्स, रसायने व इतर साहित्य असा एकूण 39,31,100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जप्त मुद्देमालात समाविष्ट:
4500 लिटर स्पिरीट (13.65 लाख रुपये)
भरलेले ड्रम व बाटल्या (15.21 लाख रुपये)
दोन वाहने – होंडा ब्रिओ कार व होंडा शाईन मोटरसायकल (4.6 लाख रुपये)
7.5 HP जनरेटर, सिलींग मशीन, लेबल्स, प्लास्टिक ड्रम्स, केमिकल्स आदी साहित्य (सुमारे 5.85 लाख रुपये)
घटनास्थळावरून ताब्यात घेतलेले आरोपी:
1. वसंत प्रदान पावरा (वय 19)
2. शिवदास अमरसिंग पावरा (वय 35)
3. अर्जुन तोयाराम अहिरे (वय 33)
4. रविंद्र नारायण पावरा (वय 18)
सर्व आरोपी हे धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील रहिवासी असून, इतर फरार आरोपींचा तपास सुरू आहे. ताडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. असून, इतर फरार आरोपींचा तपास सुरू आहे. ताडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
ही कारवाई पोलीस उप-महानिरीक्षक श्री. अंकित गोयल, पोलिस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक श्री. एम. रमेश व श्री. सत्य साई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा, विशेष अभियान पथक आणि प्राणहिता पथकाच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत धाडसीपणे हे अभियान पार पाडले.