सिरोंचा विशेष प्रतिनिधी दिनांक:-15 मे 2025 सिरोंचा तालुक्यातील कोत्तापल्ली गावात एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून अवघ्या १२ तासांत पोलीस तपास यंत्रणांनी या खुनाचा छडा लावत दोघा संशयितांना अटक केली आहे. ही घटना स्थानिकांमध्ये खळबळ निर्माण करणारी ठरली आहे.
प्राप्त माहितीनुसार, रजिता सडवली मोर्ला (वय ३० वर्षे, रा. कोत्तापल्ली) हिचा मृतदेह दिनांक १४ मे २०२५ रोजी पहाटे १:०० ते सकाळी ७:३० या वेळेत कोत्तापल्ली गावातील सांबय्या दुर्गम यांच्या कापसाच्या शेतीच्या कंपाउंडच्या बाजूला आढळून आला.
मृत महिलेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तातडीने कारवाई करत समय्या बालय्या दुर्गम (वय ३० वर्षे, रा. कोत्तापल्ली) व प्रमोद मलय्या जाडी (वय २० वर्षे, रा. नडीकुडा) या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.
महत्त्वाचे म्हणजे, या प्रकरणात अनैतिक संबंधातून खून झाल्याचा संशय महिलेच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला होता. त्यानुसार पोलीस स्टेशन असरअल्लीचे प्रभारी अधिकारी सपोनि समाधान दौड यांनी गुन्ह्याचा तपास अत्यंत कौशल्याने हाती घेतला. गोपनीय बातमीदारांची मदत व तांत्रिक माहितीच्या आधारे केवळ १२ तासांत आरोपींना शोधून काढण्यात आले.
दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि समाधान दौड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
या तपासात मा. पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. यतीश देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. साई कार्तिक, उपविभागीय पोलीस अधिकारी सिरोंचा श्री. संदेश नाईक यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लाभले.
तपासकार्यात पो.उपनि. निखील मेश्राम, पो.उपनि. प्रसाद पवार, पो.ह.वा. महेश धाईत, पो.ह.वा. संटीमल्लु लेंडगुरी, पो.शि. राजु कळंबे, संजय चाबकस्वार, प्रविण तोरैम, नेताजी राठोड यांनी परिश्रम घेतले.
गावात शांततेचा भंग करणारी ही घटना पोलिसांनी वेळीच उघडकीस आणल्यामुळे संभाव्य सामाजिक तणाव टळला. पोलीस यंत्रणेच्या वेगवान व परिणामकारक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.