सिरोंचा विशेष प्रतिनिधी दिनांक:-20 मे 2025 सिरोंचा तालुका मुख्यालयापासून अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या प्राणहिता नदीच्या नगरम घाटावर सोमवारी सायंकाळी एक हृदयद्रावक दुर्घटना घडली. डोंग्यातून फिरण्याकरिता गेलेल्या तिघांपैकी एक महिला खोल पाण्यात बुडून दगावली, तर एक महिला आणि दोन वर्षांचा चिमुकला बालकाचा थरारक बचाव करण्यात पोलिसांना यश आले.
ही दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी ५.३० वाजताच्या सुमारास घडली. सुभद्रा कृष्णामूर्ती ताडबोईना (वय ४८, रा. हैदराबाद), विनोदा सतीश पुसा (वय ३०, रा. नगरम) आणि तिचा दोन वर्षांचा मुलगा ऋग्वेद सतीश पुसा असे या घटनेतील संबंधितांचे नाव आहे. फिरण्यासाठी डोंग्यात बसलेले हे तिघे नदीत खोलवर गेल्यानंतर अचानक डोंग्याचे नियंत्रण सुटले आणि डोंगा पलटी झाला.
या दुर्घटनेत सुभद्रा ताडबोईना यांना आपला जीव गमवावा लागला. अपघातग्रस्त डोंगा उलटल्यानंतर पाण्यात अडकलेली विनोदा व तिचा बालक मदतीसाठी आर्जव करू लागले. घटनास्थळी तैनात असलेल्या सिरोंचा पोलिसांनी तात्काळ धाव घेत नदीत उडी मारून दोघांनाही वाचवले. त्यानंतर मृतदेह नदीतून बाहेर काढून सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक समाधान चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे नगरम परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
संपर्कात राहा – सिरोंचा पोलिसांकडून नागरिकांना आवाहन:
नदीत प्रवास करताना योग्य सुरक्षा उपाययोजना कराव्यात, लाइफ जॅकेटचा वापर करावा आणि प्रशासनाची परवानगी घेऊनच नौकाविहार करावा, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.