गडचिरोली, विशेष प्रतिनिधी दिनांक 20 मे 2025
जिल्ह्यात विध्वंसक कारवाया घडविण्याच्या तयारीत असलेल्या पाच जहाल माओवादी कार्यकर्त्यांना गडचिरोली पोलीस दल व केंद्रीय राखीव पोलिस दलाने (CRPF) संयुक्त कारवाईत ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सात अग्निशस्त्रांसह अन्य स्फोटक आणि संपर्क साधने जप्त करण्यात आली आहेत. या यशस्वी कारवाईने जिल्ह्यात माओवादी हालचालींना मोठा धक्का बसला आहे.
ही कारवाई भामरागड तालुक्यातील अबुझमाड परिसरातील बिनागुंडा या अतिदुर्गम जंगल भागात करण्यात आली. गोपनीय माहितीच्या आधारे १८ मे रोजी सुरू करण्यात आलेल्या या ऑपरेशनमध्ये सि-६० (विशेष कृती दल) च्या आठ टिम्स आणि सीआरपीएफ ३७ बटालियनची ए कंपनी सहभागी झाली होती. १९ मे रोजी सकाळी पोलीस पथकांनी बिनागुंडा गावाची शिताफीने घेराबंदी करून शोध मोहीम हाती घेतली. काही संशयास्पद व्यक्ती गावात हत्यारांसह लपून बसल्याचे निदर्शनास आले.
गावात सामान्य नागरिकांची उपस्थिती लक्षात घेता कोणतीही हिंसक कार्यवाही न करता पोलीस दलाने शिताफीने पाच माओवादी कार्यकर्त्यांना जिवंत ताब्यात घेतले. त्यांच्या जवळून एक एसएलआर, एक .303 रायफल, तीन सिंगल शॉट रायफल, दोन भरमार बंदुका, तीन वॉकी-टॉकी यंत्रणा आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले.
ताब्यात घेतलेल्या माओवादींची नावे पुढीलप्रमाणे:
1. उंगी मंगरु होयाम ऊर्फ सुमली (वय २८), डीव्हीसीएम, प्लाटून क्र. ३२, रा. पल्ली, ता. भैरमगड, जि. बिजापूर (छ.ग.)
2)पल्लवी केसा मिडीयम ऊर्फ बंडी (वय १९), पीपीसीएम, प्लाटून क्र. ३२, रा. कोंचल, ता. आवापल्ली, जि. बिजापूर
3. देवे कोसा पोडीयाम ऊर्फ सबिता (वय १९), सदस्य, प्लाटून क्र. ३२, रा. मारोट बाकापंचायत, ता. आवापल्ली, जि. बिजापूर
4. इतर दोन अल्पवयीन माओवादी – त्यांची वयोमर्यादा आणि ओळख निश्चित न झाल्याने पुढील कायदेशीर तपासासाठी त्यांना बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले.
तिघा जणांवर महाराष्ट्र शासनाने ३६ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते –
सुमलीवर १६ लाख,
बंडीवर ८ लाख,
सबितावर ४ लाख,
उर्वरित दोघांवर एकत्रितपणे ८ लाख.
पोलीस कारवाईत सहभागी अधिकारी:
ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदिप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, सीआरपीएफचे अजयकुमार शर्मा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस उपअधीक्षक विशाल नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली सि-६० च्या टीम्सनी ही कारवाई अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने अंमलात आणली.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे प्रतिपादन:
“गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांच्या उपस्थितीला आळा घालण्यासाठी ही एक मोठी कामगिरी आहे. अशा कारवायांमुळे माओवाद्यांचा मानसिक जोर खचतो आणि मुख्य प्रवाहात येण्यासाठी पोलीस दल त्यांना संधी देत आहे. हिंसाचार सोडून माओवाद्यांनी आत्मसमर्पण करावे,” असे आवाहनही त्यांनी केले.
गेल्या तीन वर्षांत गडचिरोली पोलिसांनी १०० पेक्षा अधिक माओवाद्यांना अटक केली असून, अशा योजनाबद्ध कारवायांमुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षेचा विश्वास अधिक दृढ होत आहे.