कालेश्वर विशेष प्रतिनिधी दिनांक 19 मे 2025 जयशंकर भूपालपल्ली जिल्ह्यातील महादेवपूर तालुक्यातील काळेश्वरम् येथे सरस्वती पुष्करालू 2025 या धार्मिक उत्सवाला 15 मेपासून उत्साही सुरुवात झाली. गोदावरी, प्राणहिता आणि गुप्त सरस्वती या त्रिवेणी संगमावर वसलेले हे क्षेत्र दक्षिणेतील प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते.
कालेश्वरम् येथील कालेश्वर मुक्तेश्वर स्वामी मंदिर हे अत्यंत प्राचीन असून, यामध्ये एका पिंडीवर दोन शिवलिंगे असलेली देशातील एकमेव वास्तू आहे. कालेश्वर लिंगाचे पूजन यमधर्मराजाने केले, तर मुक्तेश्वर लिंग हे स्वयंभू मानले जाते. श्रद्धेनुसार, येथे स्नान करून या दोन शिवलिंगांचे दर्शन घेतल्यास जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते, असे मानले जाते.
काकतीय राजवटीत या मंदिराचे महत्त्व वाढले. मंदिरात सरस्वती देवीचे प्रौढा स्वरूपातील स्थान, सूर्यदेव आणि चारही दिशांना नंदी मूर्तींची स्थापना यामुळे मंदिराला अनन्यसाधारण धार्मिक महत्त्व आहे.

ही भूमी त्रिलिंग देश म्हणून ओळखली जाते, कारण स्रीशैलम्, द्राक्षारामम् आणि काळेश्वरम् ही तीन प्रमुख शिवतीर्थे आंध्र-तेलंगण सीमांवर वसलेली आहेत.
सरस्वती पुष्कर काळात लाखो भाविक स्नानासाठी, शिवदर्शनासाठी व मोक्षप्राप्तीसाठी काळेश्वरम् येथे गर्दी करतात. विशेषतः महाराष्ट्र, छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमधून मोठ्या प्रमाणात भाविक येथे दाखल झाले आहेत.
हे मंदिर देशाच्या उत्तर-दक्षिण अक्षांवर वसलेल्या आठ प्राचीन शिवमंदिरांपैकी एक आहे – जसे केदारनाथ, रामेश्वरम्, चिदंबरम् इत्यादी. अशी संरेखन ही प्राचीन स्थापत्यशास्त्रातील असामान्य किमया मानली जाते.
कालेश्वरम् लिफ्ट सिंचन प्रकल्प देखील येथे जवळच असल्याने, हे क्षेत्र अध्यात्म, इतिहास आणि जलव्यवस्थापन यांचा संगम साधणारे केंद्र बनले आहे.
–स्नान करा | दर्शन घ्या | मोक्ष मागा | मुक्ती साधा
“कालेश्वर मुक्तेश्वराच्या चरणी जन्ममृत्यूच्या बंधनातून मुक्तीचा आशीर्वाद मिळवूया.”