गडचिरोली :(प्रतिनिधी) दिनांक:-23/05/2025. अबुझमाड भागात अलीकडेच झालेल्या सुरक्षादलांच्या कारवायांमध्ये पकडले गेलेले माओवादी आता एकामागून एक कायदेशीर प्रक्रियेत अडकल्याचे चित्र आहे. दिनांक 20 मे रोजी मौजा बिनागुंडा (ता. भामरागड) परिसरातून अटक करण्यात आलेल्या पाच माओवाद्यांपैकी दोघांनी आपली अल्पवयीनता सांगत कायदेशीर बचावाचा प्रयत्न केला. मात्र, वैद्यकीय चाचणी अहवालाने त्यांचा दावा फोल ठरवत दोघेही अल्पवयीन नसल्याचे स्पष्ट केले आहे.
ही बाब समोर आल्यानंतर, उर्वरित दोन आरोपी – राधिका बुचन्ना मडावी आणि पोडिया आयतु कुंजाम यांना आज दिनांक 23 मे रोजी कायदेशीररित्या अटक करून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, चामोर्शी यांच्या समोर हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
अटक आरोपींची ओळख:
1. राधिका बुचन्ना मडावी – प्लाटून क्रमांक 32 ची सक्रिय महिला सदस्य, रा. नेंड्रा, ता. बासागुडा, जि. बिजापूर (छत्तीसगड)
2. पोडिया आयतु कुंजाम – प्लाटून क्रमांक 32 सदस्य, रा. मरतुर, जि. बिजापूर (छत्तीसगड)
सदर दोघेही माओवादी कार्यकर्ते सशस्त्र संघर्षात सक्रिय असून सुरक्षादलांच्या तपासात त्यांच्यावर गंभीर आरोप उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संदर्भातील गुन्हा लाहेरी उपपोलीस ठाण्यात अप. क्र. 3/25 नुसार दाखल असून, तपास अधिक गतीने सुरू आहे.
संपूर्ण घटनाक्रमा व कारवाईमुळे सुरक्षादलांच्या कारवाईस बळ मिळाले असून, अबुझमाड परिसरात माओवादी संघटनेच्या हालचालींना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.