गडचिरोली राजकीय प्रतिनिधी दिनांक:-31/05/2025 भारतीय जनता पार्टीच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी प्रा. रमेश बारसागडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती भाजप प्रदेश निवडणूक अधिकारी आमदार चैनसुख संचेती यांनी अधिकृतपणे जाहीर केली. या निर्णयामुळे गडचिरोली भाजपच्या जिल्ह्याध्यक्ष पदाभोवती सुरू असलेल्या रस्सीखेचला पूर्णविराम मिळाला असून, नव्या नेतृत्वाकडून कार्यकर्त्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
भाजपच्या आतापर्यंतच्या जिल्हास्तरीय राजकारणात अनेक :-दिग्गज नेते या पदासाठी इच्छुक होते. विशेषतः विद्यमान जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, माजी सभापती प्रमोद पिपरे आणि भाजपचे जिल्हा महामंत्री गोविंद सारडा हे देखील संभाव्य दावेदार म्हणून चर्चेत होते. मात्र, त्यांना बाजूला ठेवत पक्षश्रेष्ठींनी प्रथमच धक्कादायक निर्णय घेत, प्रा. रमेश बारसागडे यांच्यावर विश्वास दाखविला आहे.
प्रा. बारसागडे हे भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते असून, त्यांनी माजी कृषी सभापती म्हणून काम केले आहे. पक्षविस्तार व ग्रामीण भागातील संघटनात्मक कामात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. त्यांच्या संयमी आणि अभ्यासू नेतृत्वशैलीमुळे कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा चांगला प्रभाव आहे.
या नियुक्तीमुळे भाजपमध्ये नव्या दमाचे नेतृत्व उदयास आले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या राजकारणात बारसागडे यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या निवडीबद्दल सर्वत्र प्रतिक्रिया उमटत असून, अनेक कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.